

पुणे : हिवाळ्यात तापमान घटल्याने सर्दी-खोकला, ताप, श्वसनाचे आजार आणि त्वचेच्या तक्रारी वाढतात. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. हिवाळ्यातील आजार टाळण्यासाठी खालील सूचना देण्यात आल्या आहेत.
थंडीपासून संरक्षणासाठी सकाळी-संध्याकाळी गरम कपडे वापरावेत. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. थंड हवा एकदम अंगावर येणार नाही, याची दक्षता घ्यावी.
सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधे घेऊ नयेत. नजीकच्या महापालिकेच्या दवाखान्यात तपासणी करून उपचार घ्यावेत. खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा मास्क वापरणे आवश्यक आहे; जेणेकरून संसर्गाचा प्रसार होणार नाही.
हिवाळ्यात पाणी कमी पिण्याची सवय लागते; मात्र दिवसातून पुरेसे कोमट पाणी प्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे. सकस व उष्मांकयुक्त आहार घ्यावा. हिरव्या भाज्या, फळे, सूप, दूध यांचा आहारात समावेश करावा.
हिवाळ्यात प्रदूषण वाढत असल्याने श्वसनाचे आजार बळावतात. दमा, हृदयरोग किंवा फुप्फुसांचे आजार असलेल्या रुग्णांनी नियमित औषधे घ्यावीत आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
नागरिकांनी साधी काळजी घेतल्यास हिवाळ्यातील आजार सहज टाळता येऊ शकतात. कोणतीही गंभीर लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.