

पुणे : गाडी पार्किंगच्या वादातून टोळक्याने कुटुंबीयांना मारहाण करत एकावर वार केल्याची घटना १४ डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता कात्रजमधील संतोषनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी टोळक्याला अटक केली आहे.
मधुकर साधुजी भगत (वय ५२, रा. कात्रज), वैभव मधुकर भगत (वय २४ ) यांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. जखमी झालेल्या ४७ वर्षीय नागरिकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, कात्रजमध्ये वास्तव्यास असलेले तक्रारदार १४ डिसेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता कात्रजमधील संतोषनगरमधील गल्ली क्रमांक ८ मध्ये गाडी पार्किंग करत होते.
त्यावेळी त्यांची आरोपींसोबत बाचाबाची झाली. त्याच रागातून आरोपींनी तक्रारदारावर लोखंडी हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. भांडणात मध्यस्थी करणार्या तक्रारदाराच्या मुलासह पत्नीलाही धक्काबुक्की करीत दमदाटी केली. याप्रकरणी सपोनि फिरोज मुलाणी तपास करत आहेत.