

15 पैकी 14 प्रभाग समित्यांवर भाजपचे राहणार वर्चस्व
राष्ट्रवादीच्या हाती भोपळा; काँग््रेासला एक जागा मिळणार
पुणे : महापालिका निवडणुकीनंतर आता प्रभागरचनेनुसार 15 क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळे यांची नव्याने पुनर्रचना केली आहे. या प्रशासकीय रचनेत हस्तक्षेप करीत भाजपने केलेल्या कुरघोडीने राष्ट्रवादी काँग््रेासला एकाही प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळू शकणार नाही. सत्ताधारी भाजपचे सर्वाधिक 14 प्रभाग समित्यांवर वर्चस्व राहणार असून, एका प्रभाग समितीवर काँग््रेासला संधी मिळणार आहे. दरम्यान, या राजकीय खेळीमुळे अनेक प्रभागांना दूरच्या अंतरावरील क्षेत्रीय कार्यालये जोडले गेल्याने नागरिकांची मात्र गैरसोय होणार आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या नवीन रचनेचे आदेश गुरुवारी जाहीर केले. महापालिका निवडणुकीत शहराची प्रभागरचना नव्याने तयार केली. त्यानुसार आता प्रशासनाकडून या नवीन प्रभागरचनेनुसार 15 क्षेत्रीय कार्यालये आणि परिमंडळे यांची रचना करण्यात आली आहे. त्यात लोकसंख्येच्या प्रमाणात काही क्षेत्रीय कार्यालयांची नव्याने हद्द निश्चित केली, तर काहींची नावे बदलली आहेत.
क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दी बदलताना भाजपच्या नगरसेवकांच्या मागण्यानुसार सोईने रचना करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
प्रामुख्याने वडगाव शेरी मतदारसंघात सहा प्रभाग येतात. त्यात जुन्या रचनेत येरवडा क्षेत्रीय कार्यालयाला प्रभाग क्र. 1, 2 आणि 6 असे प्रभाग जोडण्यात आले होते. या तीन प्रभागांत राष्ट्रवादीचे 5, काँग््रेासचे 4 आणि भाजपचे 3 अशी नगरसेवकसंख्या येत आहे. त्यामुळे ही राष्ट्रवादी काँग््रेासकडे गेली असती. त्यामुळे आता येरवडा-विमाननगर-वाघोली या नव्या क्षेत्रीय कार्यालयाला प्रभाग क्र. 4, 5 आणि 6 जोडण्यात आले. तर, नगर रोड-कळस-लोहगाव हे प्रभाग 1, 2, 3 जोडण्यात आले. या फोडाफोडीमुळे राष्ट्रवादीला मिळू शकणारी एक प्रभाग समिती गमवावी लागली आहे.
राज्यात महायुतीत एकत्र असूनही प्रभागरचनेप्रमाणेच क्षेत्रीय कार्यालयाच्या रचनेत भाजपने राष्ट्रवादीवर कुरघोडी केली आहे. त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे. येरवडा क्षेत्रीय कार्यालयाला जोडलेल्या प्रभाग क्र. 4 मध्ये खराडी-वाघोलीचा परिसर येतो. या भागातील नागरिकांना नगर रोड-कळस-लोहगाव क्षेत्रीय कार्यालय भौगोलिकदृष्ट्या जवळचे आहे. मात्र, आता या भागातील नागरिकांना थेट प्रशासकीय कामासाठी येरवडा भागात यावे लागणार आहे.
तर प्रभाग क्र. 39 हा थेट कोंढवा-उंड्री
क्षेत्रीय कार्यालयाला जोडला गेला असून, अप्पर सुप्पर-इंदिरानगर भागातील नागरिकांना थेट कोंढवा-उंड्रीला हेलपाटे मारावे लागणार आहेत. याच पध्दतीने तर प्रभाग क्र. 22 काशेवाडी-डायस प्लॉट हा थेट बिबवेवाडीला जोडण्यात आल्याने या भागातील नागरिकांची ससेहोलपट होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काँग््रेासला मिळणार एक प्रभाग समिती अध्यक्षपद
तब्बल 27 नगरसेवक निवडून येऊनही राष्ट्रवादीला एकही अध्यक्षपद मिळणार नाही. उलट 15 नगरसेवक निवडून आलेल्या काँग््रेासला वानवडी-रामटेकडी या क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग समितीचे अध्यक्षपद मिळू शकणार आहे. या क्षेत्रीय कार्यालयाला प्रभाग क्र. 18, 19 जोडण्यात आले असून, त्यात काँग््रेासचे 5, भाजपचे दोन आणि राष्ट्रवादी पवार गटाचे 1 असे नगरसेवकांचे संख्याबळ आहे.
महापालिकेच्या जुन्या रचनेत कायम वादग््रास्त ठरलेले भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय नवीन रचनेत हद्दपार केले आहे. आता भवानी पेठऐवजी कसबा पेठ कार्यालय नव्याने तयार केले आहे. जुन्या रचनेत प्रभाग क्रमांक 23 आणि 24 साठी पूर्वी जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियममध्ये भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय होते. त्याऐवजी आता या प्रभागांसाठी कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालय असेल हे कार्यालय जन्म-मृत्यू कार्यालयात स्थलांतरित होईल आणि जन्म-मृत्यू कार्यालय वैद्य स्टेडियममध्ये हलविले जाणार आहे.
परिमंडळ क्रमांक 1
1) नगर रोड-कळस-लोहगाव : प्रभाग 1, 2, 3
2) येरवडा-विमाननगर-वाघोली : प्रभाग 4, 5, 6
3) ढोले पाटील रोड : प्रभाग 13, 14
परिमंडळ क्रमांक 2
4) छ. शिवाजी नगर-घोले रोड : प्रभाग 7, 12, 29
5) औंध-बाणेर : प्रभाग 8, 9
6) कोथरूड-बावधन : प्रभाग 10, 11, 31
परिमंडळ क्रमांक 3
7) वारजे-कर्वेनगर : प्रभाग 30, 32
8) सिंहगड रोड : प्रभाग 28, 33, 34, 35
9) धनकवडी-आंबेगाव : प्रभाग 36, 37, 38
परिमंडळ क्रमांक 4
10) कोंढवा-उंड्री : प्रभाग 39, 40, 41
11) हडपसर-मांजरी : प्रभाग 15, 16, 17
12) वानवडी-रामटेकडी : प्रभाग 18, 19
परिमंडळ क्रमांक 5
13) बिबवेवाडी : प्रभाग 20, 21, 22
14) कसबा पेठ : प्रभाग 23, 24
15) विश्रामबागवाडा : प्रभाग 25, 26, 27
क्षेत्रीय कार्यालयांची रचना करताना चुकीच्या पद्धतीने केली आहे, त्यामुळे संतापाची भावना आहे. या चुकीच्या रचनेविरोधात आम्ही महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना पत्र देऊन या रचनेत दुरुस्ती करण्याची मागणी करणार आहोत.
नीलेश निकम, विरोधी पक्षनेते, पुणे मनपा