

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार याद्या अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आल्या असल्या, तरी प्रत्यक्षात त्या इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांना उपलब्ध होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. क्षेत्रीय कार्यालयांमध्ये मतदार याद्या नसल्याने इच्छुकांची धावपळ सुरू आहे. सावरकर भवन येथील निवडणूक विभागाकडे याद्या उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क अद्याप निश्चित नसल्यामुळे याद्या देण्यात येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मतदार याद्यांबाबतचा गोंधळ अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.
पालिका प्रशासनाकडून 'आधी नोंदणी करा, याद्या उपलब्ध झाल्यानंतर संपर्क केला जाईल,' असे उत्तर दिले जात आहे. मात्र, निवडणूक प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या मतदार याद्याच उपलब्ध नसल्याने राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. यंदाच्या प्रारूप मतदार यादीत अनेक ठिकाणी भौगोलिक हद्दींचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले होते. काही प्रभागांच्या हद्दीत नसलेले शेकडो मतदार इतर प्रभागांत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळे अनेक मतदारांना आपला हक्काचा प्रभाग बदलल्याचे समजल्याने गोंधळ निर्माण झाला. या त्रुटींमुळे इच्छुक उमेदवारांमध्येही धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात हरकती आणि सूचना दाखल झाल्या. प्रारूप मतदार यादीवर एकूण २२ हजार ८०९ हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार या हरकतींवर निर्णय घेण्यात येऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करण्यात आल्या. त्यानंतर सोमवारी (दि. १५) अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. मात्र, या याद्या घेण्यासाठी इच्छुक क्षेत्रीय कार्यालयांमध्ये गेले असता त्यांना प्रत्यक्ष याद्या दिल्या जात नसल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी नोंदणी केल्याशिवाय याद्या दिल्या जाणार नसल्याचे सांगितले जात असून, काही कार्यालयांमध्ये कर्मचारी किंवा याद्याच उपलब्ध नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
महापालिकेच्या निवडणूक विभागाने अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. प्रारूप मतदार यादीवर २२ हजार ८०९ हरकती प्राप्त झाल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने ४५ हजार ४०३ सुमोटो हरकती घेतल्या होत्या. या दोन्ही हरकतींमधील १८ हजार १५० हरकती अमान्य करण्यात आल्या आहेत. एकूण ४७ हजार ०७३ हरकती मान्य झाल्या आहेत. त्यामुळे ९२ हजार ४६६ मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
“सावरकर भवन येथे मंगळवारी सकाळी मतदार याद्या घेण्यासाठी गेलो होतो. मात्र, मतदार याद्यांसाठी किती शुल्क आकारायचे, हे अद्याप निश्चित नसल्याचे सांगून कर्मचाऱ्यांनी याद्या देण्यास नकार दिला. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात गेलो असता तिथे ना याद्या होत्या, ना कर्मचारी उपस्थित होते.”
ऋषिकेश बालगुडे, शहर सरचिटणीस, काँग्रेस
“मतदार याद्या प्रिंट करण्यात आल्या आहेत आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मागणीनुसार व नोंदणीनुसार मतदार याद्या दिल्या जात आहेत. नोंदणी केल्यानंतर संबंधितांना फोन करून याद्या दिल्या जातील.”
ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका