

Pune porsche car Accident
मुंबई : संपूर्ण राज्याला हादरवणार्या पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवाल याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला आहे. विशाल अग्रवाल याचा अल्पवयीन मुलाने दोन तरुण अभियंत्यांना चिरडले होते. त्याचा बचाव करण्यासाठी बांधकाम व्यावसायिक असणार्या अगरवाल याने वैद्यकीय अहवालात छेडछाड केल्याचं निदर्शनास आलं होतं. गेल्या 17 महिन्यांपासून तो कारागृहात आहेत. तसेच या प्रकरणातील अल्पवयीन तरुणाचे रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉ.अजय तावरे याचाही जामीन न्यायालयाने फेटाळला आहे.
कल्याणीनगरमध्ये १९ मे २०२४ एका पबमधून बाहेर पडलेल्या मद्यधुंद अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवून केलेल्या अपघातात दोन तरुण अभियंत्याना जीव गमवावा लागला होता. या प्रकरणात शहरातील एका बड्या उद्योगपतीच्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाच्या तपासात अनेक सुरस गोष्टी उलगडत गेल्या मद्यधूंद युवकाचे रक्ताचे नमुने रुग्णालयात बदलण्यात आले. मद्यप्राशन केलेल्या मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कारचालक आरोपी मुलाचा बाप असलेल्या विशाल अगरवालने कारस्थान रचले होते. मुलाऐवजी त्याच्या आईच्या रक्ताचे नमुने तपासणीला पाठवण्यात आले होते. या प्रकरणी 21 मे 2024 रोजी विशाल अगरवाल याला पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती.
पोलिसांनी मद्यधुंद युवकाला व त्याच्या साथीदारांना ताब्यात घेतले होते. त्यांच्यासाठी पोलीस ठाण्यात पिझ्झा व तत्सम खाद्यपदार्थ एका लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून पाठवण्यात आले. प्राथमिक टप्प्यात पोलिसांनी ढिसाळ तपास केला होता. रक्तामध्ये मद्याचा व अमली पदार्थांचा अंश सापडू नये यासाठी हेतूतः रक्ताची चाचणी विलंबाने करण्यात आली. तसेच ससून रुग्णलयातील डॉकटरांशी आर्थिक व्यवहार करून रक्ताचे नमुने बदलण्यात आले अशी धक्कादायक माहिती तपासात पुढे आली. पोर्शे कार अपघात प्रकरणात झालेल्या गंभीर चुकांकडे लक्ष वेधत महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी नुकतेच चार पोलिसांवर कठोर शिस्तभंगाच्या शिक्षेचे आदेश दिले आहेत.या कारवाईमुळे प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पोलीस निरीक्षक राहुल मुरलीधर जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ महादेव तोडकरी यांना शासन सेवेतून बडतर्फ करणे ही शिक्षा कायम करण्यात आली आहे.