

हडपसर : हडपसरमधील सह्याद्री हॉस्पिटलवर बुधवारी (दि.10) झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.16) मूक मोर्चाचे आयोजन केले होते. येथील लोहिया उद्यान ते हडपसर पोलिस स्टेशनपासून सह्याद्री हॉस्पिटलपर्यंत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, हडपसर व संलग्न पुणे परिसरात ओपीडी बंद आंदोलनही करण्यात आले.
हडपसर मेडिकल असोसिएशन, असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटस जीपीए, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र ऑर्थोपेडिक सोसायटी, पुणे ऑर्थोपेडिक सोसायटी, इंडियन सायकॅट्रिक सोसायटी या वैद्यकीय संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
यावेळी डॉ. सुनील भुजबळ, डॉ. सुनील इंगळे, डॉ. संपत डुंबरे, डॉ. संजय पाटील, डॉ. एच. ए. साळे, डॉ. सचिन आबने, डॉ. मनोज कुंभार, डॉ. राजेश खुडे, डॉ. सतीश सोनवणे, डॉ. शंतनु जगदाळे, डॉ. राहुल झांजुर्णे तसेच सह्याद्री हॉस्पिटल, हडपसर परिसरातील हडपसर मेडिकल असोसिएशनच्या सर्व व संघटनांचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.
गेल्या आठवड्यात एका रुग्णाच्या मृत्यूनंतर सह्याद्री हॉस्पिटलची तोडफोड केली होती. वैद्यकीय आस्थापनांवर केल्या जाणाऱ्या हल्ल्यामुळे भयमुक्त वातावरणात रुग्णांना सेवा देण्यात अडथळे निर्माण होत आहेत. तरी या हल्ल्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी. मुख्य आरोपींना अटक करून पुढील कारवाई व्हावी, त्यासाठी हा मोर्चा काढून पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन तसेच पोलिस आयुक्तांना पोलिस आयुक्तालयात जाऊन निवेदन देण्यात आले. हडपसर पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी सदर गुन्ह्यात केलेल्या कारवाईबद्दलची माहिती दिली. तसेच पोलिस आयुक्तांनी या गुन्ह्यात कोणाची हयगय न करता कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.