

पुणे : महापालिका निवडणुकीत मनसेसह वंचितला बरोबर घेतले जाईल. मनसे रस्त्यावर उतरलेली चालते. आंदोलनात चालते. मग महाविकास आघाडीमध्ये का नको? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
आगामी महापालिका निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी बुधवारी (दि. 26) पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मनसे, वंचित बहुजन आघाडीसह अन्य विरोधकांना एकत्र घेण्यात येईल, असे अहिर यांनी सांगितले. या वेळी शहर प्रमुख संजय मोरे आणि गजनान थरकुडे, माजी सभागृहनेता अशोक हरणावळ, वसंत मोरे यांच्यासह अनंत घरत उपस्थित होते.
मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती होत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी मागणीही अहिर यांनी केली. अहिर म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत दुबार नाव नोंदणी झाली आहे. मुंबई महापालिकेत तर महापौरांचे नाव दुबार आहे. यासंदर्भात महाविकास आघाडी म्हणून भूमिका मांडली आहे. महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचीही भेट घेतली आहे.
मात्र, निवडणूक आयोग जबाबदारी टाळत आहे. राज्य निवडणूक आयोगाने घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले असले तरी, महापालिकांकडे एवढे मनुष्यबळ आहे का, हा मोठा प्रश्न आहे. शहरातील अनेक मतदारांची नावे अन्य प्रभागात टाकली आहेत. नाव आणि पत्ता यांमध्ये मोठी तफावत आहे.
शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर नोटीसा बजावण्यात आल्यात. भाजपकडून हिंदुत्वाचा मुद्दा सातत्याने उपस्थित केला जातो. मात्र, दुसरीकडे मंडळांना नोटीसा दिल्या जातात, अशी टीका करत सर्व नोटीसा मागे घेण्यात याव्यात.
सचिन अहिर, शिवसेना (ठाकरे गट) जिल्हा संपर्कप्रमुख