

भामा आसखेड : खेड तालुक्यातील निमगाव-खंडोबा येथील घाटवस्तीवर मंगळवारी (दि. 25) रात्री अक्षरशः श्वास रोखून धरणारी घटना घडली. दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक अंगणात खेळत असलेल्या चिमुकल्या देवांश गव्हाणे (वय 5) याच्यावर झडप घातली आणि त्याला तोंडात धरून खेचत 100 मीटर दूर नेले. मात्र, आईच्या अदम्य धैर्याने देवांशचे प्राण वाचले आहेत.
या घटनेने निमगाव परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. देवांशची आई घरकामात असताना मुलाच्या किंकाळ्या कानी पडताच ती धावत बाहेर आली. त्यावेळी समोर बिबट्या तिच्या मुलाला मानेला धरून ओढत नेताना दिसला. हे पाहताच क्षणाचाही वेळ न दडपता तिने बिबट्याच्या मागे धाव घेत ‘बिबट्या... बिबट्या...’ अशी आरडाओरड केली. त्यामुळे घरातील इतर मंडळीही बाहेर आली. त्यांनीही बिबट्याच्या दिशेने धाव घेत आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने देवांशला शेताच्या चारित सोडून डोंगराच्या दिशेने शेतात धूम ठोकली.
त्यानंतर जखमी देवांशला तत्काळ चांडोली येथील ग््राामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे देवांशच्या मानेवर आणि खांद्यावर खोल जखमा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्याची प्रकृती स्थिर असून, धोका टळल्याचेही डॉक्टरांनी सांगितले.
बिबट्याच्या या हल्ल्याच्या घटनेची माहिती मिळताच खेड वन परिक्षेत्र अधिकारी व वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी भोंडवेवस्ती येथे तत्काळ दोन पिंजरे लावण्यात आले आहेत. तर घाटवस्ती येथे चार पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनपाल अधिकारी गुलाब मुके व वनरक्षक सागर तांबे यांनी दिली.
दरम्यान, खेड, आंबेगाव व जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. बिबट्या थेट मानवी वस्तीत येत असल्याने बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. निमगाव येथे आठवड्यातच मुलावर बिबट्याने हल्ला करण्याची ही दुसरी घटना आहे.
मागील आठवड्यातच निमगावच्या भोंडवेवस्ती येथील शेतात बिबट्याने यश गणेश भोंडवे (वय 15) या मुलावर हल्ला चढवला होता. त्यावेळी गावकऱ्यांनी मोठा गोंधळ करून बिबट्याला पिटाळून लावले होते. त्यानंतर बिबट्याचा वावर कायम असल्याने गावकरी सतर्क झाले होते. तरीही ही दुसरी घटना घडल्याने परिसरातील नागरिकांतून भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे.