

पुणे : पुण्यातील एका महिलेने चंदगड येथील व्यक्तीला पाण्यातून द्रव्य पिण्यास देऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला. तसेच त्या पुरुषाला आपल्या जाळ्यात खेचून काशी विश्वनाथला नेले. तेथे त्याला शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती करून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दोन लाखांची खंडणी मागितली.
याप्रकरणी चंदगड येथील एका 47 वर्षाच्या व्यक्तीच्या फिर्यादीवरून कोथरूड पोलिसांनी कोथरूडच्या रामकृष्ण परमहंसनगरातील 42 वर्षांच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 3 मार्च ते 25 नोव्हेंबर 2025 दरम्यान घडला. फिर्यादी हे त्यांच्या आणि मित्राच्या कुटुंबीयांना घेऊन गेल्यावर्षी 7 नोव्हेंबर 2024 रोजी तुळजापूर येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते. त्या ठिकाणी पुण्यातील या आरोपी महिलेची ओळख झाली. त्या ओळखीतून या महिलेने चंदगड येथील फिर्यादीच्या घरी येणे सुरू केले. फिर्यादीच्या पत्नीला तिने मी फिर्यादी यांना भाऊ मानत असल्याचा दिखावा करून तिच्यासोबत जबरदस्तीने फिरण्यास भाग पाडले.
आरोपी महिलेने हायकोर्टला वकिलीची प्रॅक्टीस करते, माझ्या खूप ओळखी आहेत, असे तिने सांगितले होते. बेळगाव येथील कलावती मंदिरात देवदर्शनाला जायचे असल्याचे महिलेने सांगितले. त्यावरून ते तिला दुचाकीवरून घेऊन गेले. वाटेत तिने तुम्ही माझे बेस्ट फेंड आहात, असे सांगून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्याला विरोध केला असता, तिने त्याची माफी मागितली.
फिर्यादीच्या पत्नीला कॉल करून पुण्यातून माझी मैत्रीण व तिचे कुटुंब आम्ही काशी विश्वनाथला जाणार आहोत. तुझ्या पतीलाही पाठवून दे, असे सांगितले. दरम्यान, काशी विश्वनाथला जाण्यासाठी फिर्यादी 25 फेबुवारी रोजी पुण्यात आले. तिच्या घरी राहिले. तेव्हा तिने आपण दोघेच विमानाने काशी विश्वनाथला जाणार आहोत असे सांगून फिर्यादी यांना काहीतरी प्यायला दिले. त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी तेथून निघून जात असताना, जर येथून तू गेलास तर तुला इथेच काहीतरी करीन, मी जे सांगेन, त्याच पद्धतीने राहायचे, असे सांगितले. त्यानंतर ते काशी विश्वनाथला गेले. तेथे गेल्यानंतर महिलेने फिर्यादीला तुला तुझ्या घरी जाऊ देणार नाही. तुझे कुटुंब उद्ध्वस्त करेन, अशी धमकी दिली. तेथील पंडिताने तुला शनि आहे. सोन्याची अंगठी घालावी लागेल, असे सांगितले होते. तिने फिर्यादी यांना 3 दिवस जबरदस्तीने काशी विश्वनाथला ठेवून घेतले.
पुण्यात आल्यावर कर्वे रोडवरील कल्याण ज्वेलर्स येथून एक सोन्याची अंगठी खरेदी करून देण्यास सांगितले. याबाबत कोठे वाच्यता केली तर तुझी बदनामी करेल. आताच्या आता 2 लाख रुपये दे, नाहीतर तुझ्या विरोधात पोलिस ठाण्यात जाऊन खोटी केस करेन, असे धमकावले. त्यानंतर तिच्या तावडीतून सुटका करून घेऊन फिर्यादी चंदगडला गावी गेले.