

पुणे : राज्यातील केंद्रशाळांच्या स्तरावर क्रीडा शिक्षकपदाला शालेय शिक्षण विभागाने मंजुरी दिली आहे. त्यानुसार क्रीडा शिक्षकांची 4 हजार 860 पदे मंजूर करण्यात आली आहेत. शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) प्रसिद्ध केला.
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक संवर्गातील 2 लाख 36 हजार 228 पदे पायाभूत पदे (प्राथमिक) निश्चित केली आहेत. राज्यातील समूहसाधन केंद्रांची (केंद्र शाळा) 21 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार पुनर्रचना केली आहे. राज्यात सद्यस्थितीत 4 हजार 860 समूह साधन केंद्रे अस्तित्वात आहेत. 15 मार्च 2024 च्या शासन निर्णयाद्वारे संचमान्यतेचे निकष सुधारित करण्यात आले आहेत. त्यानुसार केंद्रस्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे क्रीडा शिक्षक संवर्गातील पद मंजूर करण्यात आले आहे. तसेच, जिल्हानिहाय क्रीडा शिक्षकांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
सर्वाधिक क्रीडा शिक्षक पुणे जिल्ह्यात
जिल्हानिहाय निश्चित करण्यात आलेल्या विशेष शिक्षक (क्रीडा) या पदाच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक 306 शिक्षक पुणे जिल्ह्याला मिळणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्याला 251, अहिल्यानगर जिल्ह्याला 246, नाशिक जिल्ह्याला 244, रायगड जिल्ह्याला 228, सातारा जिल्ह्याला 223 शिक्षक मिळणार आहेत, तर सर्वात कमी भंडारा जिल्ह्याला 60, हिंगोली जिल्ह्याला 68, वाशिम जिल्ह्याला 71, धाराशिव जिल्ह्याला 80 शिक्षक मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.