

पुणे: महानगरपालिकेच्या निवडणुकीत चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू असल्याने प्रत्येक मतदाराने चार मते देणे बंधनकारक आहे का, चारपेक्षा कमी मते दिल्यास मतदान बाद होईल का, असे प्रश्न मतदारांमध्ये निर्माण झाले आहेत. या संदर्भात, प्रशासनाने स्पष्ट केले आहे की चारपेक्षा कमी म्हणजे एक, दोन किंवा तीन मते दिली तरीही दिलेली सर्व मते वैध ठरतील. तरीदेखील, नागरिकांनी सर्व चार मते देऊन आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यंदाच्या निवडणुकीत पुणे महापालिकेत एकूण 41 प्रभाग रचना करण्यात आली असून त्यात 40 प्रभाग चार सदस्यीय आणि एक प्रभाग पाच सदस्यीय आहे. या प्रभागांमधून एकूण 165 नगरसेवकांची निवड होणार आहे. उमेदवारांचे अर्ज भरून प्रचाराला वेग आला असून आता मोठ्या सभा आणि प्रचार रॅल्या रंगात आल्या आहेत. मतदान 15 जानेवारी रोजी होणार असून 16 जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे.
काही मतदारांना संभम आहे की दोन-तीनच मते दिल्यास उरलेले मत “नोटा”कडे जाईल का किंवा मतदान बाद होईल का, नियमांनुसार, एकच मत दिले तरी ते वैध मानले जाईल. प्रत्येक गटातील उमेदवारांच्या यादीच्या शेवटी ’नोटा’चे बटण स्वतंत्रपणे उपलब्ध असेल.
त्यामुळे मतदाराला किती उमेदवारांना मतदान करायचे आणि कुठे ’नोटा’ निवडायची याचा पूर्ण अधिकार आहे. चारपेक्षा कमी मते दिली म्हणून मतदान बाद ठरणार नाही; मात्र शक्य तितक्या सर्व जागांवर मत देणे श्रेयस्कर आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
महापालिका निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आहे. त्यामुळे प्रभागातून जितके सदस्य निवडायचे आहेत, तितकीच मते देणे बंधनकारक नाही. चारपेक्षा कमी मते दिली तरी ती वैध राहतात. तरीही सर्व मते देणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे आणि त्याचीच अपेक्षा आहे
ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका