MPSC Age Limit Protest: एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न तातडीने सोडवा : जरांगे
पुणे: एमपीएससीच्या उमेदवारांना जाणीवपूर्वक त्यांची चूक नसतानाही त्रास दिला जातोय. शासनाच्या चुकीमुळे एक ते दीड लाख एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार असाल, तर मोठी शोकांतिका आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न तातडीने सोडवा, असा निरोप थेट आंदोलनस्थळावरून मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन करून जरांगे यांनी दिला. तसेच, नदीपात्रात हजारोंच्या संख्येने जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार जरांगे यांनी व्यक्त केला.
शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन आपले सर्व दौरे रद्द करून अचानक मनोज जरांगे पुण्यात दाखल झाले. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे संयुक्त पूर्वपरीक्षेच्या पोलिस उपनिरीक्षकपदासाठी पात्र असणारे अनेक उमेदवार अपात्र ठरत आहेत. वयवाढीसाठी उमेदवारांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु परीक्षा जवळ आलेली असतानाही शासनाने कोणताच निर्णय घेतला नाही. अखेर विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले. आंदोलन दाबण्यासाठी पोलिसांनी काही तरुणांना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले.
विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणे चुकीचे आहे. त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही. अन्यथा त्यांचे कुटुंबीय आणि संबंधित स्पर्धा परीक्षार्थी येत्या महापालिका निवडणुकीत राजकीय लोकांना झटका दाखवल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे देखील जरांगे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोग संयुक्त पूर्वपरीक्षा (गट ‘ब’) 2025 मधील वयोमर्यादेच्या अन्यायकारक अटीविरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले. परीक्षा पद्धतीत अचानक झालेल्या बदलामुळे आणि 1 नोव्हेंबर 2025 ही वयोमर्यादा ग््रााह्य धरल्याने अनेक पात्र उमेदवार अपात्र ठरत असल्याचा संताप विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे. या मागण्यांसाठी पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससी परीक्षार्थींकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे या विद्यार्थ्यांसाठी जरांगे पुण्यात दाखल झाले असल्याचे दिसून आले.
स्पर्धा परीक्षार्थींवर गुन्हे दाखल
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेतील वयोमर्यादा वाढविण्यासाठी शास्त्री रस्त्यावर आंदोलन आणि निदर्शने करणाऱ्या 10 स्पर्धा परीक्षार्थींवर पुणे पोलिसांनी विनापरवाना निदर्शने केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. लोकसेवा आयोगाकडून रविवारी (दि. 4 जानेवारी) पोलिस उपनिरीक्षकपदाची परीक्षा घेतली जात आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी वयोमर्यादेवरून अचानक गुरुवारी रात्री शास्त्री रोडवर आंदोलन व निदर्शने सुरू केले. काही तासांतच हजारो उमेदवार रस्त्यावर उतरले आणि एकच गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी येऊन या विद्यार्थ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी निदर्शने सुरूच ठेवली. त्या वेळी पोलिसांनी काही उमेदवारांना ताब्यात घेतले. नंतर पोलिस ठाण्यात नेले आणि विनापरवाना एकत्रित येऊन निदर्शने केल्याप्रकरणी 10 जणांवर गुन्हे दाखल केले.
जवळपास 70 ते 80 सर्वपक्षीय आमदार, खासदार, मंत्र्यांनी मागणी करून देखील एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या रास्त मागण्या सरकार मान्य करीत नसेल तर उमेदवारांना रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय नव्हता. आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संविधानिक पद्धतीने आंदोलन करणाऱ्या उमेदवारांवर गुन्हे दाखल करणे, हे पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. उमेदवारांच्या मागण्या मान्य करून त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, अशी आमची सरकारला विनंती आहे.
नितीन आंधळे, आंदोलक विद्यार्थी

