

पुणे: ‘संकल्प बोलके हम तो निकल पडे... विजयी भव’, ‘आपलीच हवा...’, ‘लढ रे तू बळीराजा...’, ‘दंगल दंगल... ’, ‘लक्ष्य तो हर हाल में पाना है...’, ‘तू चाल पुढं, तुला रं गड्या भीती कशाची...’ अशा विविध गीतांवर प्रचारांचे रील्स आपण इन्स्टाग््रााम अन् फेसबुक पाहताना नजरेस पडलेच असतील... कारण उमेदवारांच्या प्रचारांच्या रील्सची सोशल मीडियावर धूम असून, हिंदी-मराठी अन् अगदी दाक्षिणात्य चित्रपटातील गीतांवरील रील्सची सध्या हवा आहे.
महापालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रचारासाठी रील्सचा फंडा सर्वाधिक वापरला जात असून, उमेदवारांच्या सोशल मीडिया टीमकडून दिवसभरात सुमारे पाच ते दहा रील्स अपलोड केले जात आहेत. प्रचारफेरी, सभा, मतदारांशी भेटगाठी, मोहिमांच्या विविध गीतांवरील रील्सची चलती आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून इन्स्टाग््रााम, फेसबुक आणि यू-ट्युबवर प्रचारासाठी रील्सचा फंडा सर्वाधिक वापरण्यात आला, हेच चित्र महापालिकेच्या निवडणुकांमध्येही पाहायला मिळत आहे. इन्स्टाग््रााम, फेसबुकवर रील्सची चलती असून, रील्सद्वारे उमेदवारांचा दमदार प्रचार केला जात आहे.
प्रत्येक प्रभागांतील विविध पक्षांचे उमेदवार रील्सच्या माध्यमातून प्रचार करण्यावर भर देत आहेत. खासकरून तरुण मतदारांपर्यंत पोचण्यासाठी रील्सचा वापर केला जात असून, ट्रेंडिंग गीतांवर 30 सेकंद ते एक मिनिटांचे रील्स अपलोड केले जात आहेत. अशा रील्सला हजारो व्ह्यूव्जही मिळत आहेत. उमेदवारांचे रील्स शूट करण्यासाठी चार जणांची टीम काम करत आहे. त्यात दोन व्हिडीओग््रााफर, एडिटर आणि सोशल मीडिया एक्स्पर्टचा समावेश आहे. प्रचारफेरीपासून ते मतदारांच्या भेटीगाठीपर्यंतचे व्हिडीओ शूट करून, व्हिडीओचे एडिटिंग करून, त्या व्हिडीओत गीताचा समावेश करून रील्स तयार करण्यात येत आहेत आणि हे रील्स सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत.
याविषयी सोशल मीडिया एक्स्पर्ट मयूर हुडे म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत ट्रेंड बदलत असतो. महापालिकेच्या निवडणुकीतही सर्वाधिक ट्रेंड आहे तो रील्सद्वारे केल्या जाणाऱ्या प्रचाराचा. उमेदवारांच्या प्रचारासाठी रील्सचा सर्वाधिक वापर केला जात आहे. मीही काही उमेदवारांसाठी रील्स तयार करण्याचे काम करीत आहे. उमेदवार ज्या प्रभागात निवडणुकीसाठी उभे आहेत त्या प्रभागाचे वैशिष्ट्य सांगणारे, उमेदवारांच्या विकासांपासून ते त्यांची माहिती देणाऱ्या थीमवर रील्स तयार करण्यात येत आहेत. रील्ससाठी ट्रेडिंग गीते निवडत आहोत आणि ट्रेडिंग गीतांवरील रील्स गाजत आहेत. दिवसभरात तीन ते पाच रील्स अपलोड करत आहोत.
प्रचाराचे विविध फंडे
महापालिका निवडणुकांमध्ये प्रचारासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला जात आहे. उमेदवारांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटसह राजकीय पक्षांच्या अकाउंटवरूनही प्रचार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रचारासाठीची छायाचित्रे, या पोस्टसाठी वापरलेले गीत आणि पोस्टरही पसंतीस उतरत आहेत. हात जोडून मतदारांना नमस्कार करणारे, मतदारांशी संवाद साधणारे, अशा विविध स्टाईलमधील उमेदवारांच्या छायाचित्रांचा सोशल मीडियावर बोलबाला आहे.
प्रत्येक रीलसाठी खास गीते अन् टॅगलाईनची निवड
उमेदवारांच्या प्रचारांच्या रील्स हिंदी, मराठी आणि दक्षिणात्य चित्रपटातील फेमस गीतांवर तयार केले जात आहेत. धुरंधर चित्रपटात अक्षय खन्ना यांनी ज्या गीतावर एंट्री केली आहेत, त्या गीतावरील रील असो वा आया रे तुफान... या गीतावरील रील्स... अशा ट्रेडिंग गीतांवरील प्रचारांचे रील्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून, रील्सला दिलेल्या टॅगलाईनही लक्ष वेधून घेत आहे. जनतेची साथ, विकासाची वाट..., माता-भगिनींचा निर्धार पक्का... या चिन्हावर मारा शिक्का... अशा विविध टॅगलाईनही गाजत आहेत.