

पुणे : कल्याण-लोणावळा विभागात तांत्रिक कामासाठी घेण्यात आलेल्या पावर ब्लॉकमुळे रेल्वेच्या तब्बल 20 गाड्या रविवारी (दि. 7) रोजी रद्द करण्यात आल्या होत्या. यातील 12 पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्या होत्या तर 8 पुणे-लोणावळा दरम्यान उपनगरीय सेवा पुरवणाऱ्या लोकल गाड्या होत्या.
पुणे-मुंबई दरम्यान रोज हजारो चाकरमानी प्रवास करतात. त्यांना ये-जा करण्यासाठी पुणे-मुंबई दरम्यान दररोज एक्सप्रेस गाड्या धावतात. मात्र, रेल्वे प्रशासनाने रविवारी घेतलेल्या पावर ब्लॉकमुळे रविवारी तब्बल 20 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या.
रविवारी बहुसंख्य चाकरमान्यांची सुट्टी असते, त्यामुळे रविवारी ब्लॉक घेतल्यामुळे रेल्वेच्या वाहतूकीवर म्हणावा तसा परिणाम झाला नाही. मात्र, रविवारी पुणे-मुंबई पर्यटनाचे नियोजन करून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास झाला. त्यांना बाय रोड प्रवास करावा लागला. मात्र, रविवारी सायंकाळी 6 नंतर पुन्हा रेल्वे सेवा सुरळीत झाली.
पुणे-मुंबई इंटरसिटी, इंद्रायणी एक्सप्रेस, सिंंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस आणि चाकरमान्यांची लाडकी डेक्कन क्वीन रविवारी रद्द करण्यात आली होती. याशिवाय पुणे-लोणावळा-तळेगाव दरम्यान धावणाऱ्या आठ लोकल गाड्याही रद्द करण्यात आल्या होत्या.
तसेच, गाड्या रद्द करण्यासोबतच रेल्वे प्रशासनाने पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या 8 गाड्यांच्या वेळेत बदल केला होता. तर 5 गाड्यांचे मार्ग रविवारी बदलले होते. तर 7 गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट (निम्म्यापर्यंत धावल्या) करण्यात आले होते.