

पुणे: शहरातील रखडलेल्या रस्त्यांच्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला पुन्हा गती देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, पुढील वर्षभरात ३३ प्रस्तावित मिसिंग लिंकपैकी १२ महत्त्वाच्या लिंक पूर्ण करण्याचा संकल्प महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या विकास आराखड्यासह (डीपी) समाविष्ट गावांच्या प्रादेशिक विकास आराखड्याचा (आरपी) विचार करून ऑगस्ट २०२२ मध्ये शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. या पाहणीत भूसंपादन, तांत्रिक अडचणी आणि अन्य कारणांमुळे अनेक रस्त्यांची कामे अपूर्ण राहिल्याचे स्पष्ट झाले. हे अपूर्ण दुवे जोडल्यास नव्या रस्त्यांची आवश्यकता मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा निष्कर्ष काढत पथ विभागाने मिसिंग लिंक विकसित करण्याचा निर्णय घेतला.
यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सल्लागार संस्थेने मुख्य शहरासह नव्याने समाविष्ट गावांचे सर्वेक्षण करून शहरात सुमारे ७०० मिसिंग लिंक असून, त्यांची एकूण लांबी ५२० किलोमीटर असल्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर वाहतुकीवर परिणामकारक ठरणाऱ्या ३३ मिसिंग लिंक प्राधान्याने विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आवश्यक ठिकाणी सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया राबविण्याचेही निश्चित करण्यात आले.
या ३३ लिंकची एकूण लांबी सुमारे १२ किलोमीटर असून, त्या पूर्ण झाल्यानंतर सुमारे ६० किलोमीटर लांबीचे सलग रस्ते नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध होतील, असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र, गेल्या दीड वर्षापासून या प्रकल्पाची गती मंदावल्याने मिसिंग लिंकची कामे कागदावरच राहिल्याची टीका होत होती. त्यानंतर प्रशासनाने वर्षभरात १२ महत्त्वाच्या मिसिंग लिंक पूर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
वर्षभरात पूर्ण होणाऱ्या मिसिंग लिंक
राजाराम पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (जावळकर उद्यानमार्गे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते रोसरी स्कूल अंडरपास
बाणेर-पाषाण लिंक रोड
गणराज चौक ते कस्पटेवस्ती
नागरस रोड (औंध) ते बालेवाडी स्टेडियम (ज्युपिटर हॉस्पिटलमार्गे)
गुंजन चौक ते कल्याणीनगर-कल्याणीनगर ते खराडीएबीसी चौक ते गाडीगुत्ता चौक (एन. एम. रोड हेअर स्टुडिओ ट्रँगल लिंक)
मुंढवा आरओबी ते केशवनगर (मंत्रा)
ह्यूम पाइप ते प्रयेजा सिटी रोड, धायरी (कोद्रे फार्ममार्गे)
लोकमत प्रेस ते सावित्री गार्डन
नवले पूल ते वाकड (सेवा रस्ता)