

पुणे: शहरात अवघे ५४ खड्डे शिल्लक असल्याचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या दाव्याला प्रत्यक्ष पाहणीत छेद मिळाल्यानंतर प्रशासन अखेर खडबडून जागे झाले आहे. पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची मोहीम महापालिकेने युद्धपातळीवर हाती घेतली असून, डांबर प्रकल्प कार्यान्वित करून हॉटमिक्स आणि कोल्डमिक्सच्या साहाय्याने दुरुस्तीची कामे वेगाने सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
शहरातील विविध भागांमध्ये प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर महापालिकेच्या '५४ खड्ड्यांच्या' दाव्याचे वास्तव समोर आले होते. त्यानंतर पथ विभागाने दुरुस्ती मोहिमेला गती दिल्याचे चित्र दिसत आहे. कात्रज, हडपसर, सिंहगड, नगर रस्ता यांसह शहरातील प्रमुख मार्गांवर खड्डे बुजविण्याची कामे सुरू असून, सर्वाधिक वाहतूक असलेल्या रस्त्यांना प्राधान्य दिले जात आहे.
पथ विभागाचे प्रमुख राजेश बनकर यांनी सांगितले की, पावसाचा जोर कमी होताच डांबर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. हॉटमिक्स आणि कोल्डमिक्स या दोन्ही तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती सुरू आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरील खड्डेही टप्प्याटप्प्याने बुजविले जात असून, शहरातील वाहतुकीवर परिणाम होऊ नये, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, प्रशासनाच्या दाव्यानंतरही अनेक भागांतील नागरिक अद्याप समाधानी नाहीत. शहरातील अनेक रस्त्यांवर मोठे खड्डे कायम असून, वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची वस्तुस्थिती आहे. काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेली मलमपट्टी पावसाच्या सरींनंतर पुन्हा उखडून खड्डे पूर्ववत होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात आहेत.
महापालिकेने दुरुस्ती मोहिमेला वेग दिला असला, तरी शहर पूर्णपणे खड्डेमुक्त झाल्याचा दावा करण्यापूर्वी प्रत्यक्ष परिस्थितीचा वस्तुनिष्ठ आढावा घेणे आवश्यक असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करून सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्याची अपेक्षाही पुणेकरांकडून व्यक्त होत आहे.