

पुणे: जिल्हा न्यायालय (सिव्हिल कोर्ट) स्थानकावर महामेट्रो आणि हिंजवडी-शिवाजीनगर पुणेरी मेट्रोलाईनला थेट जोडणारा विशेष स्कायवॉक सुरू केला असून, तो प्रवाशांच्या सेवेसाठी खुला केला आहे.
या स्कायवॉकच्या सुविधेमुळे स्वारगेट, कात्रज किंवा पिंपरी-चिंचवडच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना सिव्हिल कोर्ट स्थानकात उतरून थेट स्कायवॉकद्वारे हिंजवडी लाईन ३ कडील जिल्हा न्यायालय स्थानाकातून हिंजवडीला पोहोचता येणार आहे. या स्कायवॉकमुळे हिंजवडीला जाणाऱ्या ‘पुणेरी मेट्रो’ आणि ‘महामेट्रो’च्या जाळ्यातील इंटरचेंज कसा करायचा, याबाबत प्रवाशांमध्ये असलेला संभ्रम आता दूर होत आहे.
महामेट्रोकडील लाईन एक आणि दोनमधून पुणेरी मेट्रो (हिंजवडी-शिवाजीनगर) लाईन तीनमध्ये कसा प्रवास करायचा यासंदर्भात अनेक पुणेकर प्रवाशांना मोठा संभ्रम होत होता. मात्र, दैनिक पुढारीच्या वतीने नुकतीच या ठिकाणी पाहणी करण्यात आली. त्या वेळी दोन्ही मेट्रोच्या जिल्हा न्यायालय स्थानकांना जोडणारा विशेष स्कायवॉक सुरू केल्याचे पाहायला मिळाले. या स्कायवॉकमुळे औद्योगिक क्षेत्रातील कर्मचारी आणि आयटीयन्स प्रवाशांचा प्रवास सोपा होत असल्याचे पाहायला मिळाले.
काय आहे नवीन व्यवस्था?
थेट कनेक्टिव्हिटी :- महामेट्रोचे जिल्हा न्यायालय स्थानक आणि पुणेरी मेट्रोचे शिवाजीनगर (जिल्हा न्यायालय) स्थानक हे दोन्ही आता या पादचारी पुलाने (स्कायवॉक) एकमेकांना जोडले गेले आहेत. प्रवाशांना रस्त्यावर उतरून किंवा बाहेरून फिरून जाण्याची गरज उरलेली नाही. एकाच इंटरचेंजवरून दुसरे स्टेशन सहज गाठता येता आहे. यामुळे प्रवाशांची धावपळ कमी झाली आहे. स्कायवॉकमुळे बदलत्या प्रवासाची (इंटरचेंज) प्रक्रिया सुलभ झाली असून प्रवाशांचा वेळ वाचत आहे.
मी अनेकदा स्वारगेटहून हिंजवडीला प्रवास करतो. आधी सिव्हिल कोर्ट मेट्रोस्थानकात उतरून हिंजवडीच्या मेट्रोस्टेशनवर कसे जायचे, बाहेरून रस्ता क्रॉस करायचा की कुठे जायचे, यावरून खूप गोंधळ व्हायचा. पण या स्थानकावरून थेट स्कायवॉक सुरू झाल्यामुळे काही मिनिटांत एका मेट्रोतून दुसऱ्या मेट्रोच्या स्थानकांत जाता येत आहे. रस्त्यावरच्या ट्रॅफिकचा मोठा त्रास वाचला आहे. आमच्यासारख्या पुणेकरांसाठी ही कनेक्टिव्हिटी खरोखरच सोयीची ठरत आहे.
दिनेश शिंदे, मेट्रो प्रवासी