

पुणे: कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यासह परराज्यांतून शेतमालाची आवक वाढत असून, शेतमालाला हंगामानुसार अतिरिक्त जागेची आवश्यकता निर्माण झाली आहे. काही वर्षांपूर्वी डाळिंबाच्या आवकसाठी उभारण्यात आलेल्या कॉमन शेडमध्ये काही अडतदारांनी मुक्काम ठोकत वैयक्तिक गाळे निर्माण केले.
त्यामुळे, अन्य व्यापाऱ्यांना आपल्याकडील अतिरिक्त माल उतरविण्यासाठी जागा नसल्याने विरोध होऊ लागल्यानंतर प्रशासनाने येथील चार अडत्यांच्या शेडवर अर्धवट कारवाई करून भीती दाखविली. मात्र, आता हेच डाळिंब शेड 14 व्यापाऱ्यांमध्ये वाटून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यामध्ये कोट्यवधींची उलाढाल होणार असल्याच्या चर्चाही बाजारात रंगल्या आहेत.
डाळिंबाचा व्यापार लक्षात घेऊन बाजार समितीने मार्केट यार्डच्या काही वर्षांपूर्वी गेट नंबर चारलगत जागेत डाळिंब यार्ड उभारले. त्यात चार आडत्यांना डाळिंब व्यापारास जागा दिली. त्यानुसार काही वर्ष सुरळित व्यापार सुरू होता. त्यानंतर, बहुतांश अडत्यांकडे आवक वाढू लागल्यानंतर त्यांनीही अतिरिक्त आवक होत असल्याचे सांगत डाळिंब यार्डात जागा मिळण्यासाठी मागील दोन तीन वर्षांपासून प्रशासनाकडे तगादा लावला होता. दरम्यान, डाळिंब यार्डासाठी निवडलेली ही जागा न्यायालयीन वादात असतानाही तेथे यार्ड उभारण्याचे प्रयत्न झाले. आवकेनुसार जागा वाटपाचे आराखडेही तयार करण्यात आले. मात्र, तीन ते चार वेळा प्रयत्न होऊनही प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकली नाही.
पुढे बांबू मार्केट परिसरात पर्यायी जागेवर भाडेकरार करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र, तत्कालीन पणन संचालकांनी त्यास स्थगिती देत याबाबत काही कार्यवाही न करण्याची आदेश दिले होते. आता संचालक मंडळ आल्यावर पुन्हा या डाळिंब यार्डचा विषय समोर आला असून, त्यामध्येही आर्थिक देवघेव करणाऱ्या तसेच मर्जीतील अडतदारांना जागा देण्याच्या विचार सुरू असल्याची चर्चा आहे.
स्वतःचे गाळे भाड्याने देऊन शेतमालासाठी अतिरिक्त जागेची मागणी करणे चुकीचे आहे. ठराविक वाणाला जागा देऊन एकाधिकारशाही तयार होते. त्यामुळे ठराविक व्यापाऱ्यांना जागा न देता सर्वांसाठी स्वतंत्र हॉल ठेवावा. ज्याच्याकडे जास्त शेतमाल त्याची व्यवस्था त्या हॉलमध्ये करावी. बाजारात दररोज तब्बल खरबुजाचे 15 ते 16 टेम्पो मी माझ्या गाळ्यावर विक्री करत होतो. कधीही अतिरिक्त जागेची मागणी केली नाही.
सौरभ कुंजीर, अध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशन, मार्केट यार्ड.
मार्केट यार्डातील शेतमालाचा व्यापार बाहेर चालला आहे. टप्प्याटप्याने बोरे, लिंबू, तरकारी, पालेभाज्यांचे व्यापार बाहेर गेले आहेत. मार्केट यार्ड आता किरकोळ बाजार होत चालला आहे. त्यामुळे आमचा सर्व शेडला विरोध आहे. बाजारातील सर्व व्यापार गाळ्यावरच व्हावा. यामुळे सर्व अडतदारांना समान न्याय मिळेल.
अमोल घुले, अध्यक्ष, श्री शरद गजानन आडते असोसिएशन, मार्केट यार्ड.