

पुणे/ बिबवेवाडी: पूर्वीच्या वादातून एका तरुणावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि. 6) रात्री सव्वाअकराच्या सुमारास घडली. शिवजयंतीची मिरवणूक पाहून हा तरुण घराकडे परतत होता, त्यावेळी मार्केटयार्ड परिसरात ही घटना घडली, या हल्ल्यात मोजेश मलिकार्जुन शेकापुरे (वय 20, रा. काकडेवस्ती, कोंढवा रोड) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या असून, एक गोळी त्याच्या पाठीत लागली आहे. सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात राम उपाम (वय 30), बालाजी उमाप (वय 22) राजू उमाप (वय 55, राहणार तिघे मीनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी), हर्षद ढोरे (वय 30), सिद्धार्थ गायकवाड (वय 28), गोविंद कुंभार ( राहणार सर्व सहकारनगर, अरण्येश्वर), आनंद उमाप (वय 22, रा. वडगाव, सिंहगड रोड) आणि इतर दोन अशा नऊ जणांच्या विरुद्ध आर्म ॲक्टसह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील बालाजी, साहिल, राजू, शुभम आणि आनंद यांना मार्केटयार्ड पोलिसांनी, तर इतर दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने बारा तासांच्या आत पकडले आहे. यातील बहुतांश आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजित जगताप यांनी सांगितले. याबाबत मोजेश याचा भाऊ सागर शेकापुरे (वय 29, रा. काकडेवस्ती, कोंढवा रोड) याने फिर्याद दिली आहे. मागील वर्षी नवरात्रोत्सवाच्या वेळी दाढीला हात लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आला आहे.
फिर्यादी सागर हा सिंहगड कॉलेज परिसरात कॉफी शॉप चालवतो. तो 6 मार्च रोजी 11.30 च्या सुमारास सागर शेकापुरे आणि हसन अलीरजा शेख यांच्यासह मुकुंदनगर परिसरात शिवशक्ती मित्रमंडळाच्या शिवजयंती मिरवणुकीसाठी गेला होता. मिरवणूक संपल्यानंतर ते घरी निघाले. यावेळी सागर याचा भाऊ मोजेश शेकापुरे आणि त्याचा मित्र निखिल ज्ञानोबा लगाडे हे देखील त्यांच्यासोबत होते. सर्वजण दुचाकीवरून वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक या रस्त्यावरून जात असताना अचानक तीन दुचाकींवरून आलेल्या नऊ जणांच्या टोळीने त्यांचा पाठलाग केला.
या टोळीतील बालाजी उमाप आणि राम उमाप यांनी मोजेश शेकापुरे यांच्यावर पिस्तुलातून दोन वेळा गोळीबार केला, तर हर्षल ढेरे आणि सिद्धार्थ गायकवाड यांनी लोखंडी शस्त्र दाखवत धमकी देत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच राजू उमाप, आनंद उमाप आणि अन्य दोन जणांनी दुचाकीवरून पाडण्याचा प्रयत्न केला. गोळी मोजेश शेकापुरे याच्या पाठीवर लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. जखमी अवस्थेत याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणातही काहींचा सहभाग
मागील महिण्यात मार्केटयार्ड परिसरात स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत हवेत गोळीबार झाला होता. तसेच सहा ते सात महिन्यांपूर्वी सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलाचा खून करण्यात आला होता. या दोन्ही गुन्ह्याशी यातील काही आरोपींचा संबंध असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पूर्वीच्या वादातून हा गोळीबार घडला आहे. यातील संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
विश्वजित जगताप, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मार्केट यार्ड पोलिस ठाणे