

पुणे: शहरावर कोणत्याही स्वरूपाचा हल्ला झाला तर कसे सज्ज राहावे, हे दाखवणारे थेट प्रात्यक्षिक आणि प्रदर्शन दक्षिण कमांडच्या वतीने दाखविण्यात आले. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी पुण्यात येऊन ही प्रात्यक्षिके पाहिली. यात रासायनिक, जैविक, किरणोत्सर्ग आणि अणुहल्ला या धोक्यांविरुद्ध एकात्मिक राष्ट्रीय तयारी कशी असेल याचा समावेश होता.
दक्षिण कमांडच्या वतीने औंध मिलिटरी स्टेशन येथे आयोजित केलेल्या लष्करी-नागरी (फ्यूजन सराव) सरावाचा समारोप संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मोठ्या प्रमाणात या सरावात लष्कर, हवाई दल, नागरी प्रशासन, पोलिस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, वैद्यकीय पथके, कॅडेट्स, शैक्षणिक संस्था आणि उद्योग भागीदारांसह 19 सहभागी संस्था एकत्र आल्या होत्या.
दक्षिण कमांडच्या लष्करी-नागरी फ्यूजन उपक्रमाचा भाग म्हणून आयोजित या सरावाचा उद्देश अस्थिरता, अनिश्चितता, गुंतागुंत आणि अस्पष्टता असलेल्या युद्धजन्य स्थितीच्या वातावरणात जटील आपत्कालीन परिस्थितींना प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी लष्करी आणि नागरी समन्वय मजबूत करणे हा होता.