

पुणे: आकर्षक कलाकुसर करून सजलेली १६ किलो सोन्याची साडी आणि सुमारे दोन किलो सोन्यापासून तयार करण्यात आलेला रत्नजडीत मुकुट दसऱ्यानिमित्त सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला परिधान करण्यात आला. सुवर्णवस्त्रांनी सजलेले हे महालक्ष्मी देवीचे रूप पाहण्यासोबतच दर्शनाकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे वर्षातून दोनवेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजन या दिवशी देवीला ही साडी परिधान करण्यात येते. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक आणि विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ॲड. प्रताप परदेशी, विश्वस्त आणि उत्सव प्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त भरत अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा, राजेश सांकला, रमेश पटोदिया, राजकुमार चमडीया, नीलेश लद्दड यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी यंदाच्या उत्सवाचे आयोजन केलेे.
हैदराबादमध्ये साडीची कलाकुसर साकारण्यात आली. प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या की, पुरातन काळापासून दसऱ्याच्या दिवशी सोने लुटण्याची परंपरा आहे. त्या परंपरेनुसार सोन्याच्या साडीत श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन भाविकांना व्हावे, याकरिता ही साडी देवीला नेसवली जाते. हैदराबादमध्ये साडीची कलाकुसर साकारण्यात आली असून, सुमारे ६ महिने काम सुरू होते. आकर्षक नक्षिकाम करून ही साडी देवीसाठी साकारण्यात आली आहे. त्यामुळे सुवर्णवस्त्रातील हे रूप भाविकांना दसऱ्याच्या दिवशी दिवसभर पाहण्याची संधी मिळाली.
उत्सवप्रमुख डॉ. तृप्ती अग्रवाल म्हणाल्या, सुमारे २ किलो सोन्याच्या मुकुटावर करण्यात आलेले अतिशय सुबक आणि नाजूक नक्षिकाम हे विशेष लक्षवेधी आहे. पारंपरिक धार्मिक संकल्पना, उत्कृष्ट सुवर्णकारिता आणि कलात्मक सौंदर्य, यांचा सुंदर संगम या मुकुटामध्ये पाहायला मिळाले. दसऱ्याच्या निमित्ताने भाविकांसाठी हा सुवर्ण मुकुट विशेष आकर्षण ठरले असून, श्री महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला आणखी एक दिव्य आणि वैभवशाली स्वरूप प्राप्त झाले आहे.
यंदा आयोजित केलेल्या रावणदहन कार्यक्रमात देखील महिला अत्याचार आणि स्त्री भ्रूणहत्येसारख्या समस्यांच्या प्रतीकात्मक रावणाचे दहन करून समाजात स्त्री सबलीकरणाचा संदेश दिला. तसेच, समाजातील वाईट विचार, व्यसनाधीनता यांसारख्या अपप्रवृत्तीरुपी रावणाचे दहन केले. विश्वकर्मा विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, पदाधिकारी यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. तसेच, यंदा प्रथमच आरोग्य शिबिरात भक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान शिबिरात देखील सहभाग घेतला.
श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे २५ फूट प्रतीकात्मक रावणदहन
महिला अत्याचार, स्त्री भ्रूणहत्या, बालशोषण यांसह विविध सामाजिक समस्यांच्या प्रतीकात्मक रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरासमोर केले होते. या वेळी प्रभू श्रीराम यांची वानरसेना आणि रावणाची सेना यांच्या युद्धाचा जिवंत प्रसंग आणि संपूर्ण रामायणाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. रावणाची भव्य हलती प्रतिकृती तसेच जिवंत देखाव्यातील हनुमान आणि जटायू हे यंदाचे प्रमुख आकर्षण ठरले. मंदिरासमोर प्रतीकात्मक रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल २५ फूट उंच प्रतीकात्मक रावणाचे दहन या वेळी करण्यात आले. नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीचा जागर करण्यासह नारीशक्तीचा सन्मान देखील करण्यात आला.