

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीवर अखेर शिक्कामोर्तब झाले असून जागावाटप निश्चित झाले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) हे तीन प्रमुख पक्ष समसमान जागा लढविणार आहेत. तिन्ही पक्ष प्रत्येकी ५० जागांवर निवडणूक लढवतील, तर समविचारी मित्रपक्षांना १५ जागा देण्यावर एकमत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. याआघाडीत मनसेचा समावेश नसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपने पुणे महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना दूर ठेवल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची चर्चा होती. यासंदर्भात दोन्ही पक्षातील नेत्यांच्या अनेक बैठकाही झाल्या. मात्र जागावाटप आणि निवडणूक चिन्हावरून मतभेद झाल्याने ही आघाडी फिस्कटली. तर दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवार गटाशी युती नको, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसने घेतली. यासर्व घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) च्या नेत्यांनी महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
यासंदर्भात शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत तसेच शनिवारी सलग दोन दिवस झालेल्या बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे पुण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) आणि समविचारी पक्ष भाजपविरोधात एकत्रित मोट बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडी आधीपासूनच अस्तित्वात आहे. अजित पवार गटाला आघाडीत घ्यावे की नाही, यावर मतभेद होते. मात्र भाजपसोबत सत्तेत असलेल्या पक्षाला आघाडीत घेऊ नये, असे वरिष्ठांनी स्पष्ट केल्याने अजित पवार गटाबाबत निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढविण्यास तयार आहे. पुण्यातील आघाडीत मनसेचा समावेश नाही. समसमान जागावाटप करण्यात येणार असले, तरी एखाद्या प्रभागात ज्या पक्षाचा उमेदवार अधिक सक्षम असेल, त्याला प्राधान्य देण्यात येईल.”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – ५०
काँग्रेस – ५०
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) – ५०
समविचारी मित्रपक्ष – १५
भाजपची उमेदवारी यादी जाहीर होईपर्यंत महाविकास आघाडी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची यादी जाहीर होणार नसल्याची चर्चा आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांवर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि महाविकास आघाडीचा डोळा असणार आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारी यादीनंतरच कोण कोणत्या पक्षात जाणार, हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र चर्चा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, मनसे
पुणे महापालिका निवडणुकीसाठी तिन्ही प्रमुख पक्षांना समान जागावाटप करण्यात आले आहे. समविचारी मित्रपक्षांनाही १५ जागा देण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडी भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या विरोधात ताकदीने निवडणूक लढवेल.”
संजय मोरे, शहरप्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
समान प्रमाणात जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले आहे. ज्या प्रभागात ज्या पक्षाचा प्रबळ उमेदवार असेल, त्या पक्षाला ती जागा दिली जाईल. एकजुटीने भाजपविरोधात लढा देणार आहोत.”
अरविंद शिंदे, शहराध्यक्ष, काँग्रेस
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाबरोबर युतीची चर्चा सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीस आम्हाला बोलावण्यात आले होते; मात्र आघाडीत सामील होण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. तसेच शनिवारी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची बैठक पार पडली. महाविकास आघाडीबाबत काही निर्णय झाल्यास पक्षाचे वरिष्ठ योग्य तो निर्णय घेतील.”
साईनाथ बाबर, शहराध्यक्ष, मनसे
अजित पवार गटाने दोन्ही राष्ट्रवादी पक्षांनी आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास नकार दिल्याने आघाडी शक्य झाली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
अंकुश काकडे, प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष)