

पुणे : राज्याच्या सर्वच भागांत गेल्या सहा ते सात दिवसांपासून 'आधार ' (यूआयडी) पडताळणी सेवा बंद आहे. त्यामुळे ऑनलाइन भाडेकरार नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे काम खोळंबले आहे. मुद्रांक शुल्क विभागाच्या ऑनलाइन प्रणालीत तांत्रिक बिघाड झाला आहे. त्यामुळे सेवा ठप्प झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आधार पडताळणी होत नसल्यामुळे भाडेकराराची प्रक्रिया थांबली आहे. महसूल विभागाकडून डीआयटी आधार पडताळणीसाठीची तांत्रिक समन्वयाची जबाबदारी माहिती तंत्रज्ञान संचालनालय (डीआयटी) मुंबई यांच्याकडे असते. या खात्यामार्फत पाठवण्यात येणारी विनंती युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) प्रणालीकडे जाते. तेथे आधारची पडताळणी झाल्यानंतरच भाडेकरार नोंदणी पूर्ण होते. मात्र, हीच साखळी सध्या खंडित झाली आहे.
नोंदणी व मुद्रांक विभागाचे (आयजीआर) संकेतस्थळ ऑनलाइन पेमेंटसाठी 'ग्रास' प्रणाली आणि आधार पडताळणीसाठी 'यूआयडीएआय' प्रणाली यांच्या समन्वयातून कार्यरत आहे. आधार पडताळणीसाठी राज्य शासनाचा 'डीआयटी' सध्या 1.9 या प्रणालीत मुंबई आणि पुणे ग्रामीण सोडून उर्वरित महाराष्ट्रात दररोज चार ते पाच हजार भाडेकरारांचे दस्त नोंदवले जातात. मात्र, पडताळणी बंद असल्याने हे सर्व व्यवहार रखडले आहेत.