

पुणे : पुणे-मुंबई मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात आले असून, मे (2026) महिन्यापासून हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत मिसिंग लिंकचे 93 टक्के काम पूर्ण झाले आहे.
राज्य शासनाने 'एमएसआरडीसी'ला मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम करण्यासाठी दिले होते. त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून या लिंकचे काम सुरू होते. मात्र, मे महिन्यापासून ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे या लिंकच्या दरीपुलाचे काम करणे आव्हानात्मक बाब होती. दरम्यान, पावसाची तीव्रता कमी झाल्यानंतर पुन्हा काम सुरू करण्यात आले. द्रुतगती महामार्गावर खोपोली एक्झिट ते कुसगावदरम्यान 19 किलोमीटर एवढे अंतर आहे.
या प्रकल्पाच्या कामास 2019 पासून सुरुवात झाली. पुणे ते मुंबई द्रुतगती महामार्गावरील घाटांतील 13.3 किलोमीटर अंतर कमी करण्यासाठी 1.68 किलोमीटर आणि 8.87 किलोमीटरचे दोन बोगदे तयार केले आहेत. तसेच देशातील सर्वाधिक 181 मीटर उंचीचा दरीपूल उभारला आहे. त्या पुलाचा एक भाग तयार झाला असून, उर्वरित पुलाचा दुसरा मार्ग एकमेकांना जोडण्याचे तसेच केबल लावण्याचे 93 टक्के काम पूर्ण झाले आहे.
- मार्च 2026 पर्यंत काम पूर्ण होऊन हा पूल मे महिन्यात खुला होण्याची शक्यता आहे.
-2019 मध्ये प्रकल्पाचा खर्च सहा हजार 900 कोटी रुपयांचा होता. तो आता साडेसात हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
पुण्याहून मुंबईकडे जाताना किंवा पुण्यात येताना प्रवासादरम्यान काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या वेळी मदतीसाठी बोगद्यात अलार्म यंत्रणा बसविण्यात आली आहे.