

पुणे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष अर्थात सीईटी सेलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या विद्यार्थी सहाय्यता केंद्रामध्ये 40 जिल्हा संपर्क अधिकारी कंत्राटी तत्त्वावर नेमणार आहे. त्यासाठी राज्यातील सेवानिवृत्त शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना येत्या 10 जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन सीईटी सेलच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष विस्तार केंद्रासाठी जिल्हानिहाय ही पदे भरली जाणार आहेत. ही भरती केवळ तात्पुरती स्वरूपाची असणार आहे. एक वर्ष कालावधीसाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून, काम असमाधानकारक आढळल्यास सीईटी सेलचे आयुक्त यांच्या अनुमतीने एक महिन्याची नोटीस देऊन संबंधित कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली जाणार आहे. उमेदवार 10 जानेवारीपर्यंत est.cetcell@gmail.com या ईमेलवर अर्ज सादर करू शकतात
उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक. संगणक व माहिती तंत्रज्ञानाचे पुरेसे ज्ञान असणे गरजेचे. पदव्युत्तर पदवीधारकांना प्राधान्य. विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा प्रक्रिया आणि केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया यांचे ज्ञान व अनुभव असलेल्यांना प्राधान्य, एम. एस. ऑफिस, स्कॅनिंग, प्रिंटिंग आणि मूलभूत डिजिटल, पोर्टल ऑपरेशन्स, तसेच सीईटी सेल पोर्टलची माहिती असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
- शासन सेवेतून गट-अ / गट-ब राजपत्रित पदावरून निवृत्त अधिकाऱ्यांना प्राधान्य. निवृत्तीच्या वेळी अथवा सध्या त्यांच्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी, न्यायालयीन कार्यवाही प्रलंबित नसावी.
- अर्जदाराचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे.
- उत्कृष्ट संवाद, समन्वय आणि समुपदेशन कौशल्य आवश्यक.
- मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांवर प्रभुत्व असणे आवश्यक.
- संबंधित जिल्ह्यात राहणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य. राहण्याची व जेवणाची कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही.
- नियुक्ती पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून, कालावधी एक वर्षाचा राहील.
- अपवादात्मक परिस्थिती व सक्षम अधिकारी यांच्या मान्यतेशिवाय राजीनामा स्वीकारला जाणार नाही.
- वेतन व सेवा अटी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष ठरवेल.