

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व ३२ प्रभागांतील सुमारे सातशे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी घेतल्या. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे स्पष्ट झाल्यानंतर अजित पवार यांनी तातडीने हालचाली करीत पिंपरी चिंचवडमध्ये काही इतर पक्षांतील माजी नगरसेवकांना प्रवेश देत तेथील इच्छुकांशी संवाद साधला.
पवार यांच्यासोबत मुलाखत घेण्याच्या प्रक्रियेत पक्षाचे नेते विलास लांडे, अण्णा बनसोडे, योगेश बहल, नाना काटे, अजित गव्हाणे हे स्थानिक नेते उपस्थित होते. बारामती हॉस्टेल येथे सकाळी सात वाजल्यापासून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. या मुलाखती सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू होत्या. प्रत्येक इच्छुक उमेदवाराची राजकीय ताकद, प्रभागातील स्थिती, तसेच पक्षाची त्या भागातील सद्य:स्थिती याची माहिती घेत पवार यांनी सर्वांना भाजपविरोधात लढावयाचे असल्याचे स्पष्टपणे सांगितले. इच्छुकाशी संवाद साधताना अजित पवार स्वतःच पुढाकार घेत प्रत्येकाला प्रश्न विचारत होते. मुलाखतीदरम्यान संबंधित प्रभागाची भौगोलिक रचना, सामाजिक समीकरणे तसेच त्या प्रभागातील भाजपची सद्यःस्थिती याबाबत सविस्तर माहिती पवारांनी घेतली.
अजित पवार उमेदवारांना थेट आणि परखड प्रश्न विचारले. 'तुम्ही किती पॉवरफुल आहात?, पक्षाने तुम्हालाच तिकीट का द्यावे? आपले मतदान वाढवण्यासाठी काय रणनीती आखली आहे? मतदार किती आहेत आणि त्यांचे स्वरूप कसे आहे? आतापर्यंत कोणती विकासकामे केली आहेत? अशा स्वरूपाची विचारणा पवार करीत होते. विशेष म्हणजे, प्रत्येक इच्छुक उमेदवाराने केलेल्या कामांची फाईल, अहवाल अजित पवार यांनी स्वतः तपासून पाहिले, केवळ दावे नव्हे, तर प्रत्यक्ष कामगिरीच्या आधारे उमेदवारी ठरवण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.
या प्रक्रियेमुळे पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार निवडीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतंत्र लढण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेशांसाठी इच्छुकांनी गर्दी झाली. भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये काही माजी नगरसेवकांसह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले. आणखी काहीजण संपर्कात असल्याचे सांगितले जात आहे.. भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे, अश्विनी जाधव, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रूपाली आल्हाट, शिवसेना उपशहर प्रमुख नेताजी काशीद यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.
पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी मंगळवारी अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या तब्बल ७०० पेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. यातील ४४१ जणांनी उमेदवारी अर्ज पक्ष कार्यालयात जमा केले आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्यावर आता पुणे महापालिकेच्या इच्छुकांच्या मुलाखती कधी होणार, याकडे लक्ष आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १८ डिसेंबर असल्याने त्यानंतरच पुण्यातील इच्छुकांच्या मुलाखती होण्याची शक्यता आहे.