

पुणे : विविध देशांमधील सुमारे 140 चित्रपट पाहण्याची संधी 24 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) चित्रपटप्रेमींना मिळणार आहे. पुणे फिल्म फाउंडेशन, राज्य सरकारचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या (दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई) वतीने आयोजित हा महोत्सव यंदा 15 ते 22 जानेवारी या कालावधीत रंगणार आहे.
महोत्सवातील जागतिक चित्रपट स्पर्धा विभागामध्ये 14 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी मंगळवारी (दि. 16) पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवातील चित्रपट सेनापती बापट रस्त्यावरील पॅव्हेलियन मॉलमधील पीव्हीआर (६ स्क्रीन), ई-स्क्वेअर- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता (३ स्क्रीन) आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी) - राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे (एनएफएआय) - विधी महाविद्यालय रस्ता (१ स्क्रीन) अशा १० स्क्रीनमध्ये हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात जागतिक आणि मराठी चित्रपट स्पर्धात्मक विभाग आणि अन्य विभागांमध्ये सुमारे 140 चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. दिवंगत ज्येष्ठ अभिनेते - दिग्दर्शक गुरुदत्त यांचे जन्मशताब्दी वर्ष ही यंदाच्या महोत्सवाची थीम असणार आहे.
चित्रपट महोत्सवाची सुरुवात (ओपनिंग फिल्म) 'ला ग्राझिया' (इटली) या पावलो सोरेंटीनो दिग्दर्शित चित्रपटाने होणार असून, महोत्सवाचा समारोप (क्लोजिंग फिल्म) 'फादर मदर सिस्टर ब्रदर' (अमेरिका, आयर्लंड, फ्रान्स) या जीम जारमुश दिग्दर्शित चित्रपटाने होणार असल्याचे डॉ. पटेल यांनी सांगितले. जागतिक चित्रपट स्पर्धात्मक विभागात १०३ देशांमधील ९०० हून अधिक चित्रपट आले होते. त्यातील १४ चित्रपटांची अंतिम फेरीसाठी निवड केली आहे. आंतरराष्ट्रीय ज्युरींमार्फत या चित्रपटांचे परीक्षण केले जाणार असून, सर्वोत्कृष्ट आंतराष्ट्रीय चित्रपटास 'राज्य सरकारचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' दिला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुणे फिल्म फाउंडेशनचे विश्वस्त सतीश आळेकर, सबिना संघवी, चित्रपट निवड समितीचे अध्यक्ष समर नखाते आदी उपस्थित होते.
- 'अ सॅड ॲण्ड ब्युटिफुल वर्ल्ड' - लेबनन, अमेरिका, जर्मनी, सौदी अरेबिया, कतार
- 'ऍडम्स सेक' – बेल्जियम, फ्रान्स
- 'ऑल दॅट्स लेफ्ट ऑफ यू' - जर्मनी, सायप्रस, पॅलेस्टाइन, जॉर्डन, ग्रीस, सौदी अरेबिया, कतार
- 'ॲज वुई ब्रेथ' - तुर्की, डेनमार्क
- 'ब्लू हॅरॉन' - कॅनडा, हंगेरी
- 'लॉस्ट लँड' - जपान, फ्रान्स, मलेशिया, जर्मनी
- 'मिल्क टीथ' - रोमानिया, फ्रान्स, ग्रीस, डेनमार्क, बल्गेरिया
- 'निनो' - फ्रान्स
- 'रीबिल्डिंग' - अमेरिका
- 'सायलेंट फ्रेंड' - जर्मनी, हंगेरी, फ्रान्स
- 'स्पाईंग स्टार्स' - फ्रान्स, भारत, श्रीलंका
- 'द एलिसियन फील्ड' - भारत
- 'धिस इज माय नाइट' - सिरिया, युएई
- 'व्हाईट स्नेल' - ऑस्ट्रिया, जर्मनी