

पुणे: धर्मांतरासाठी एका तृतीयपंथीयावर दबाव आणून त्याला मारहाण करण्यात आल्याची घटना कोथरूड भागात घडली. तसेच त्याला धमकावून त्याच्या घरातील सहा लाख ७० हजार रुपयांची रोकड लुटण्यात आली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी हे तृतीयपंथीय आहेत.
याबाबत एका ३० वर्षीय तृतीय पंथीयाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, नऊ तृतीयपंथीयांविरुद्ध दरोडा, धमकाविणे, तसेच महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियमन २०२६ मधील कलमे, तसेच तृतीयपंथीय व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम २०१९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी ३० वर्षीय तृतीय पंथीय हा कोथरूडमधील रामबाग काॅलनी परिसरातील एका मंदिराजवळ राहायला आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आरोपी गुन्हा दाखल करण्यात आलेले नऊ तृतीयपंथीय हे त्याच्या घरात शिरले. त्यांनी हिंदू धर्माविषयी अपमानास्पद वक्तव्य केले. ‘ तू धर्म सोडून दुसऱ्या धर्माचा स्वीकार कर’, अशी धमकी दिली. फिर्यादी तृतीयपंथीयाला पट्टा, बांबूने मारहाण केली. भिक्षेतील ५० टक्के वाटा न दिल्यास जीवे मारु, अशी धमकी दिली. आराेपी तृतीयपंथीयांनी त्याला धमकावून घरातील सहा लाख ७० हजारांची रोकड लुटली, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके, पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी घटनास्थळी भेट दिली.
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेले आरोपी तृतीयपंथीय हे गणेश पेठेत राहायला आहेत. धर्मांतरासाठी दबाब आणण्याचे प्रकार रोखण्यासाठी नवीन कायद्याची निर्मिती नुकतीच करण्यात आली. या कायद्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. पुणे शहर परिसरात धर्मांतरसाठी दबाब आणल्या प्रकरणी आतापर्यंत तीन गुन्हे दाखल झाले आहेत. धर्मांतरासाठी दबाब आणणल्या प्रकरणी एका धर्मगुरुविरुद्ध खडक पोलीस ठाणे, तसेच एका तरुणाविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक हर्षल कदम तपास करत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात देखील एका ३७ वर्षीय तृतीयपंथीयाने दिलेल्या तक्रारीनुसार सहा तृतीयपंथयींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोन्ही प्रकरणे एकमेकांच्या संदर्भाने आहेत. फिर्यादी तृतीयपंथीये हिचे धर्मगुरू आणि शिष्य परिवाराच्या अनुषंगाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून त्यांची बदनामी करण्यात आली. तसेच ते धर्मांतर करत असल्याचे सांगून त्यांची बदनामी करण्यात आल्याचे म्हटले आहे.