

पुणे: एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आंदोलनाशी संबंधित दाखल करण्यात आलेला हा दुसरा गुन्हा आहे.
एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासह विविध मागण्यांसाठी १ ऑक्टोबरपासून एस. एम. जोशी पुलावर आंदोलन सुरू आहे. आंदोलनाची परवानगी रद्द केल्याची माहिती दिल्यानंतर नवी पेठेतील लालबहाद्दूर शास्त्री रस्त्यावर बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी शुक्रवारी एमपीएससी विद्यार्थी प्रतिनिधींसह १५ जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शनिवारी ड्रोन उडवल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी पोलिस हवालदार युवराज भारत टोळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिगंबर भारत खारे (रा. तुकाराम हाइट्स, तुकारामनगर, गायमुख, आंबेगाव), प्रमोद पाटील, शिवराज मोरे, ऋषिकेश गागुर्डे आणि अक्षय कांबळे यांच्याविरुद्ध बीएनएसच्या कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पोलिस हवालदार टोळे हे एस. एम. जोशी पुलावर कर्तव्य बजावत होते. त्या वेळी आंदोलनस्थळी ड्रोन उडताना दिसला. टोळे यांनी शोध घेतला असता, आंदोलनाच्या मागील बाजूस जनरेटरजवळ दिगंबर खारे रिमोट कंट्रोलरच्या साहाय्याने ड्रोन चालवत असल्याचे आढळले.
खारेकडे ड्रोनद्वारे चित्रीकरणाचा परवाना व स्थानिक पोलिस विभागाची परवानगी आहे का, अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी त्याच्याकडे कोणताही परवाना किंवा पोलिसांची परवानगी नसल्याचे त्याने सांगितले. चौकशीदरम्यान, आंदोलनात सहभागी असलेल्या प्रमोद पाटील आणि इतरांच्या सांगण्यावरून ड्रोन आणल्याचे त्याने सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी ड्रोन जप्त केला असून, विश्रामबाग पोलिस पुढील तपास करत आहेत.
माझ्यावर गुन्हा दाखल करा!
लोकप्रतिनिधी म्हणून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी असतानाही पोलिस माझ्याऐवजी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना जाणीवपूर्वक त्रास देत आहेत. सरकारचे ऐकून पोलिस विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करणे, नोटिसा देणे असे प्रकार करत आहेत. केवळ आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांकडून हा त्रास दिला जात आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत अध्यक्ष भीमनवार यांचा राजीनामा घेतल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही. यासंदर्भात विश्रामबाग पोलिस ठाण्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली असून, आंदोलनाला परवानगी मिळण्यासाठी अर्ज सादर केले आहेत, असे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.