

पुणे: चंद्राच्या शीतल प्रकाशात दुधाचा नैवेद्य दाखवून मसालेदार दुधाचा आस्वाद घेण्याची परंपरा जपण्यासाठी पुणेकरांची लगबग सुरू झाली आहे. कोजागरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर घरगुती ग्राहकांसह गृहनिर्माण सोसायट्या आणि सार्वजनिक मंडळांकडून दुधाला चांगली मागणी होत असल्याने शनिवारी गणेश पेठेतील दूधभट्टीत खरेदी-विक्रीच्या व्यवहारांना वेग आला. गणेश पेठेतील दूध बाजारात दोन ते अडीच हजार लिटर दुधाची आवक झाली असून, १८ लिटरच्या घागरीला १३०० रुपये भाव मिळाला तर एक लिटर दुधाची ७३ रुपये भावाने विक्री झाली.
मात्र, दुष्काळामुळे दुधाच्या आवकेला मोठा फटका बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. दूध व्यापारी दामोदर ऊर्फ तात्या हिंगमिरे म्हणाले, गणेश पेठेतील दूधभट्टीत लष्कर परिसरातील गवळीवाडा, वाघोली, केसनंद, वाडेबोल्हाई, मावळ, वेल्हा भागातून दोन ते अडीच हजार लिटर दुधाची आवक झाली. यंदा दुष्काळाचा मोठा परिणाम दुधाच्या आवकेवर झाला आहे. दरवर्षी कोजागरीच्या पार्श्वभूमीवर चार ते पाच हजार लिटर दुधाची आवक होते. यंदा अवघी दोन ते अडीच हजार लिटरवर आली आहे. याखेरीज, यंदा दोन पौर्णिमा आल्या आहेत. त्यामुळे दोन दिवस दुधाला मागणी राहिल. कोजागरीच्या तुलनेत दसऱ्याच्या दोन दिवसांपूर्वी मिठाई विक्रेत्यांकडून दुधाला चांगली मागणी राहिली. याकाळात १८ लिटरच्या घागरीला १५०० रुपये दर मिळाला. दरवर्षी, पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर मंडळे तसेच सोसायट्या दुधाची मागणी नोंदवतात. दुष्काळामुळे दुधाची आवक निम्म्यावर आली असली, तरी कोजागरीचा उत्साह मात्र कायम असल्याचे निरीक्षण विक्रेत्यांकडून नोंदविण्यात आले.
चंद्र आहे साक्षीला...
चंद्रप्रकाशात मसाला दुधाचा आस्वाद, कुटुंबीयांसोबत गप्पा-गोष्टी, मित्रमंडळींसोबत धमाल आणि चंद्रावर आधारित गीतांची मैफल...अशा उत्साही वातावरणात आज म्हणजेच रविवारी (दि.२५) कोजागरी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. कोजागरीच्या निमित्ताने घरोघरी आणि सोसायट्यांमध्ये विशेष तयारी करण्यात आली असून, शहरातील विविध ठिकाणी सांगीतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्राच्या साक्षीने रंगणाऱ्या सुरेल मैफलींसह एकत्र येण्याचा आनंद पुणेकरांना अनुभवता येणार आहे.
कोजागरी पौर्णिमेला देवी-देवतांचे विधिवत पूजन करण्यात येणार आहे. तसेच, रात्री चंद्र प्रकाशात मसाला दूध पिण्याला विशेष महत्त्व असल्याने घरोघरी मसाला दूध तयार करण्याची लगबग पाहायला मिळणार आहे. घराच्या गच्चीत, बाल्कनीत किंवा सोसायटीच्या मोकळ्या जागेत कुटुंबीय आणि मित्रमंडळी एकत्र येऊन पौर्णिमा साजरी करणार आहेत. रोजच्या धावपळीत एकमेकांसोबत निवांत वेळ घालवण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे.
सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन
चंद्रावर आधारित मराठी आणि हिंदी चित्रपटगीतांच्या मैफलीही रंगणार आहेत. गीतांसोबतच विविध खेळ, खाद्यपदार्थ आणि गप्पांच्या फडात रमण्याचे नियोजनही अनेकांनी केले आहे.
कोजागरी पौर्णिमेनिमित्त यंदाही भाविकांना दूध वाटपाचे नियोजन केले आहे. त्यासाठी १५ लिटर दुधाची आगाऊ नोंदणी केली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुधाचे दर काहीसे वाढले आहेत. मात्र, दरवाढीपेक्षा सणाचा उत्साह आणि परंपरेचे जतन महत्त्वाचे आहे. त्यामुळे वाढीव दराचा विचार न करता कोजागरीचा उत्सव उत्साहात साजरा करून भाविकांना दूधवाटप करण्यात येणार आहे.
सौरभ जगताप, उपाध्यक्ष, साईनाथ नवरात्र महोत्सव समिती