

पुणे: दिवाळीच्या खरेदीसाठी पुण्यातील मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने शनिवारी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. यावेळी वाहतूक पोलिसांच्या नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला. चारचाकी, दुचाकी आणि व्यापाऱ्यांची मालवाहू वाहने एकाच वेळी बाजारपेठांमध्ये दाखल झाल्याने भरदुपारी शहराच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीचा बोजवारा उडाला.
हजारो नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजनाचा यंदा मात्र अभाव दिसत आहे. त्यामुळे वाहतूक शाखा नेमकी करते तरी काय, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. लक्ष्मी रस्ता, टिळक चौक, रविवार पेठ, शनिवारवाडा, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता आणि कावळेकर रस्ता या परिसरासह सहकारनगर व उपनगरांतही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अनेक वाहनचालकांनी दिसेल त्या ठिकाणी वाहने उभी केल्याने वाहतुकीला आणखी अडथळे निर्माण झाले. भिडे पुलालगत नदीपात्राच्या बाजूने जाणाऱ्या मार्गावरही अस्ताव्यस्त पार्किंग केली होती. त्यामुळे मुख्य रस्त्यांसह अंतर्गत गल्लीबोळांमधील वाहतूकही ठप्प झाली. खरेदीसाठी बाहेर पडलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबांना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
सणासुदीच्या खरेदीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. दिवाळीच्या काळात मध्यवर्ती बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होणार, याचा अंदाज वाहतूक शाखेला नव्हता का? दरवर्षीचा अनुभव असतानाही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आधीच उपाययोजना का केल्या नाहीत? गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलिसांची नियुक्ती का झाली नाही? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीचे प्रभावी नियोजन करावे
विश्रामबाग वाहतूक विभागाने कर्मचारी रस्त्यावर उतरवले होते. मात्र, अनेक ठिकाणी मोजकेच कर्मचारी दिसत होते. गर्दीच्या तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी पडत असल्याने वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न निष्प्रभ ठरल्याचे चित्र होते. केवळ कर्मचारी रस्त्यावर तैनात करून उपयोग नाही, तर वाहतुकीचे प्रभावी नियोजन, नो-पार्किंगची कठोर अंमलबजावणी, मालवाहू वाहनांच्या प्रवेशावर नियंत्रण आणि गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करणे आवश्यक होते.