

पुणे: व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांना पुरविण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेवरून राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी काही वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. शुक्रवारी (दि. २३) ही बैठक पार पडली. तब्बल तीन तास चालेल्या या बैठकीत राणा यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. राणा यांची सुरक्षा व्यवस्था निर्धारित नियमांना अनुसरून नसल्याचे समोर आल्यानंतर दाते यांनी या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
दाते म्हणाले, तुम्ही आयपीएस अधिकारी आहात. भारतातील सर्वोत्कृष्ट सेवेत तुमची निवड झाली आहे. तुमच्याकडे मेरीट आणि क्षमता आहे म्हणून तुम्ही या सेवेत आहात. तुमच्यावर कोणाचा दबाव असेल तर मला सांगा, मी ते पाहून घेईल. राणा यांना देण्यात आलेल्या सुरक्षेत इतरही काही जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे दाते यांच्या निदर्शनास आले आहे. त्यांनी याबाबत संबंधित जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना जाब विचारत खडे बोल सुनावले. एवढेच नाही तर अपर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता (कायदा व सुव्यवस्था) यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी देण्यात आली आहे.
व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राणा शिपिंग कंपनीबरोबरच गडचिरोली येथे त्यांचे काही व्यवसाय असल्याचे समजते. त्यांच्यावर यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये अक्कलकोट येथे देखील हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ही सुरक्षा राणा यांना देण्यात आली. राणा यांच्या सुरक्षेत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असतो. त्यांना एस्कॉर्टदेखील देण्यात आले आहे. राज्याच्या अनेक मंत्र्यांशी त्यांचे निकटवर्ती संबंध असल्याचे बोलले जाते. त्यातूनच अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी देखील राणा यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येते.
रविवारी (दि. १८) बारामती तालुक्यातील गोजुबावी भागात सायंकाळी राणा यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी हल्ला केला. सुरुवातीला गोळीबार झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला होता. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या एका अल्पवयीनांसह दोघांना पकडले. तेव्हा प्राथमिक तपासातच या हल्ल्याचे प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात अडकले. पोलिसांच्या हाती महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले. त्यामध्ये राणा यांची निकटवर्तीय तीन माणसे संशयाच्या भोवऱ्यात दिसून आली. पोलिस आपल्याला ताब्यात घेतील याचा सुगावा लागताच त्यांनी पळ काढला. हायप्रोफाईल प्रकरण असल्यामुळे याचे पडसाद राज्य पोलिस दलात उमटले.
राणांच्या सुरक्षेसाठी परजिल्ह्यातील पोलिस तैनात
व्यावसायिक राणा सूर्यवंशीप्रकरणाचा थेट पोलिस महासंचालकांनी आढावा घेतला. त्यावेळी या प्रकरणाच्या अनुषंगाने राणा यांना देण्यात आलेल्या सुरक्षेबाबत अनेक गंभीर गोष्टी पुढे आल्या. राणा यांच्या सुरक्षेत दोन अंगरक्षक, घरी गार्ड आणि एस्कॉर्ट असे म्हटले तर सहा ते सात कर्मचारी असणे आवश्यक आहे. मात्र, त्यांच्याकडे पुणे शहर पोलिस दलातील कर्मचारी सोडता इतर काही जिल्ह्यातील पोलिस ताफ्यात असल्याचे समोर आले आहे. त्याच अनुषंगाने आता चौकशी सुरू करण्यात आली आहे.