

राजगुरुनगर: पुणे-नाशिक महामार्गावरील खेड घाट परिसरात पैसे मागण्याच्या कारणावरून तृतीयपंथी आणि एका वाहनातील प्रवाशांमध्ये वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी ( दि २३ ) रात्री घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी खेड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून, पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या तक्रारीत म्हाळुंगे येथील जीवन जावळे यांनी सांडभोरवाडी फाट्याजवळ लघुशंके साठी वाहन थांबवले. यावेळी येथे असलेल्या तृतीयपंथीशि त्यांची बाचाबाची झाली. अन्नु दाभाडे, मुन्नी दाभाडे, सान्वी दाभाडे आणि तन्वी सिंग यांनी दगडाने मारहाण करून डोक्याला दुखापत केल्याचा आरोप केला आहे.
तसेच वाहनातील विशाल भोसले यांच्या गळ्यातील दोन सोन्याच्या साखळ्या ओढल्याचा आणि वाहनावर दगड मारून नुकसान केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दुसऱ्या तक्रारीत मुन्नी अंजली दाभाडे यांनी खेड घाटातील थिगळेवस्ती परिसरात वाहनांकडून पैसे मागत असताना संबंधित वाहनातील चौघांनी तेथे येऊन वाद घातल्याचा आरोप केला आहे.
आपण पोलीस असल्याचे सांगून तेथे उभे राहण्याबाबत जाब विचारण्यात आला. त्यानंतर मारहाण, विनयभंग आणि शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच वाहनाच्या धक्क्यामुळे अन्नु दाभाडे खाली पडून जखमी झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे.
या दोन्ही घटनांप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हे रजिस्टर क्रमांक ६७७/२०२६ आणि ६७८/२०२६ असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांचा तपास पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण व पोलीस करीत आहेत. दरम्यान, दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी आरोप केल्याने या प्रकरणात नेमकी घटना कशी घडली, याबाबत पोलिसांच्या तपासातून स्पष्टता येणार आहे.