मांडवगण फराटा; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची वसाहत, शेतीला कालव्याद्वारे पाणी देण्याची पहिली पद्धत आणि स्वस्तिकचे भांडे हे सर्व सापडले होते इनामगाव येथील उत्खननस्थळी; मात्र सध्या हे ठिकाण पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. या उत्खनन स्थळाला संरक्षित क्षेत्र घोषित करण्याची मागणी इनामगाव ग्रामस्थांनी केली आहे. (पुणे उत्खनन स्थळ)
पुण्यापासून १०० किलोमीटर व शिरूरपासून अवघ्या ४० किलोमीटरवर असलेले इनामगाव हे तालुक्यातील शेवटचे गाव आहे. घोड नदीतीरावर असलेले हे दुष्काळी गाव आहे. इनामगाव येथे सन १९६८ ते १९८३ च्या दरम्यान घोड नदीतीरावर असलेल्या पाच टेकड्यांवर उत्खनन करण्यात आले. हे उत्खनन डॉ. ह. धो. सांकलीचा, डॉ. म. के. ढवळीकर, डॉ. झै. अन्सारी या शास्त्रज्ञांच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने करण्यात आले होते. (पुणे उत्खनन स्थळ)
या उत्खननात ताम्रपाषाणयुगीन मानवी संस्कृतीचे अवशेष सापडले होते. महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची वसाहत याच ठिकाणी होती. या उत्खननात हत्ती, रानटी बैल, रानमेंढी, शेळी आदींसह सस्तन प्राण्यांचे जीवाष्म आढळले होते. आद्य शेतकऱ्यांची घरे, हत्यारे यामध्ये (तासण्या, भोक पडण्याचे हत्यार, छिलके, टोकदार हत्यारे), वेगवेगळ्या प्रकारची मातीची भांडी (लाल किंवा लाल-काळी), शेतीची अवजारे आदी आढळून आली होती. हा काळ तब्बल ४० ते ५० हजार वर्षांपूर्वीचा आहे. (पुणे उत्खनन स्थळ)
मात्र सध्या गेल्या अनेक वर्षांपासून हे उत्खनन स्थळ शासकीय अनास्थेमुळे पूर्णपणे दुर्लक्षित झाले आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे उगवली आहेत. या ठिकाणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते तुकाराम मचाले यांनी संरक्षित स्थळ म्हणून दर्जा मिळावा, तसेच हे स्थळ विकसित करण्यात यावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. (पुणे उत्खनन स्थळ)
इनामगाव येथील उत्खननातील अवशेष व वस्तू डेक्कन कॉलेज पुरातत्त्व संग्रहालय, श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, अहमदनगर व भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. या उत्खननातील वस्तू व अवशेषांचा १९८२ साली ग्रेट ब्रिटन येथे जागतिक प्रदर्शनामध्ये सहभाग होता.
त्याकाळी शेतात वेगवेगळी धान्ये घेतली जात होती. मृतांचे दफन करण्याची वेगळी पद्धत, त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतीला कालव्याद्वारे पाणी देण्याची पहिली पद्धत याच ठिकाणी अस्तित्वात होती. येथील अस्थी कुंभात दफन करण्याच्या पद्धतीमुळे यांचे द्रविड संस्कृतीशीही संबंध होते. तसेच या उत्खननात मातृदेवता, पितृदेवता या मूर्ती मिळाल्या आहेत. या उत्खनन व संशोधनामुळे महाराष्ट्राच्या आद्य शेतकऱ्यांच्या जीवनाचे अनेक पैलू उजेडात आले आहेत. त्यामुळे येथील उत्खननास भारतीय पुरातत्त्वच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हेही वाचलतं का?