नाशिक : रुग्णालयातील सोनोग्राफी मशीनचा गैरवापर? ; गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याचा संशय | पुढारी

नाशिक : रुग्णालयातील सोनोग्राफी मशीनचा गैरवापर? ; गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याचा संशय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : वर्धा येथील रुग्णालयात घडलेल्या स्त्रीभ्रूण हत्येच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य खात्याने दिलेल्या आदेशानुसार नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील सोनोग्राफी सेंटर तसेच गर्भपात केंद्र तपासणीची मोहीम गेल्या तीन दिवसांपासून हाती घेतली आहे. या तपासणीत मुंबई नाका येथील एका रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन गायब केल्याची बाब उघडकीस आली असून, मनपाने संबंधित डॉक्टरविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बीडमधील परळी आणि त्यानंतर वर्धा येथे कदम नावाच्या रुग्णालयात स्त्रीभ्रूण हत्या होत असल्याच्या घटना उघडकीस आल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. स्त्रीभ्रूण हत्येसंदर्भात अनेक कडक कायदे करूनही घटना घडत असल्याने आरोग्य खात्याने पुन्हा एकदा आपले लक्ष सोनोग्राफी सेंटर आणि गर्भपात केंद्रांकडे वळविले असून, राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना गोपनीयरीत्या केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नाशिक महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागामार्फत अचानकपणे गोपनीय पद्धतीने शहरातील सोनोग्राफी सेंटर आणि गर्भपात केंद्राची तपासणी करण्यासाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांची भरारी पथके तयार करून त्यामार्फत संबंधित सेंटर तसेच केंद्रांची गेल्या तीन दिवसांपासून तपासणी सुरू केली आहे. सोनोग्राफी व गर्भपात केंद्राची नोंदणी, मशीन खरेदी व त्याची नोंदणी तसेच इतरही सर्व प्रकारचे रेकॉर्ड तपासणी करण्यात येत आहे. नाशिक शहरात आजमितीस 322 सोनोग्राफी सेंटर आणि 148 इतके गर्भपात केंद्रांना मनपाच्या आरोग्य वैद्यकीय विभागाने मान्यता दिलेली आहे. तीन दिवसांत 130 सोनोग्राफी सेंटरची तपासणी करण्यात आली असून, त्यात मुंबई नाका येथील वासन आय केअरच्या नावाने नोंदणी असलेले बी स्कॅन हे मशीन गायब असल्याची बाब उघडकीस आली आहे.

संबंधित डॉ. अजित धुमाळ यांच्याकडे मशीनसंदर्भात माहिती मागविली असता ती देण्यात आलेली नाही. यामुळे मुंबई नाका पोलिस ठाण्यात डॉ. धुमाळविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मशीनचा गैरवापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वासन आय केअरच्या नावे नोंदणी असलेल्या व परवानगी दिलेले मशीन गायब झाल्याने अनेक तर्कवितर्क काढण्यात येत असून, पोलिस तपासात अनेक बाबी उघड होण्याची शक्यता आहे. शहरातील अद्याप निम्म्याहून अधिक सोनोग्राफी सेंटर तसेच गर्भपात केंद्रांची तपासणी बाकी आहे. तपासणी धडक मोहीम पूर्ण झाल्यानंतर त्यासंदर्भातील अहवाल आरोग्य खात्याकडे सादर केला जाणार असल्याची माहिती डॉ. नागरगोजे यांनी दिली.

गर्भधारणापूर्व आणि गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा तसेच वैद्यकीय गर्भपात कायद्याप्रमाणे गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा असून, त्यासाठी 50 हजार रुपये दंड आणि 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. शहरात वा आपल्या आसपास अशा प्रकारचा गुन्हा घडत असल्यास संबंधितांनी मनपाशी संपर्क साधावा. माहिती देणार्‍याचे नाव गुपित ठेवले जाईल.
– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधीक्षक-मनपा

हेही वाचा :

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Back to top button