नाशिक : 2,800 कोटींचे दायित्व फेडण्यातच जाणार मनपाचे बजेट, आयुक्त सोमवारी स्थायीकडे | पुढारी

नाशिक : 2,800 कोटींचे दायित्व फेडण्यातच जाणार मनपाचे बजेट, आयुक्त सोमवारी स्थायीकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; 2022-23 चे चालू वर्षाचे आणि 2021-22 चे सुधारित अंदाजपत्रक नाशिक मनपा आयुक्त येत्या सोमवारी (दि.7) स्थायी समितीपुढे सादर करणार आहेत. सुमारे 2,300 कोटींचे बजेट ऑनलाइन बैठकीत सादर होणार असून, मनपाचे 2,800 कोटींचे दायित्व पाहता संपूर्ण बजेट परतफेड करण्यातच जाणार आहे. यामुळे नवीन भांडवली कामांविनाच वर्ष जाणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिटको रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.

महापालिकेची प्रारूप प्रभागरचना सादर झाल्याने नाशिक मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेपूर्वीच अंदाजपत्रक सादर होऊन त्यावर अंमलबजावणी करण्याकरिता सत्ताधारी भाजपकडून जोरदार तयारी सुरू आहे. साधारण फेब—ुवारी महिन्याच्या अखेरीस आयुक्तांकडून स्थायी समितीवर अंदाजपत्रक सादर केले जाते. परंतु, निवडणूक प्रक्रिया आणि स्थायी समिती सभापतींचा कार्यकाळ 28 फेब—ुवारीला संपुष्टात येत असल्याने अंदाजपत्रकाबाबत लगीनघाई सुरू आहे.

मार्चमध्ये महापालिका निवडणुकीसाठी किमान एक महिना आधीच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता गृहीत धरून आयुक्तांनी 14 जानेवारीला अंदाजपत्रक सादर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी खातेप्रमुखांना जमा-खर्चासह पुढील वर्षाच्या खर्चाचे नियोजन, महत्त्वाच्या योजनांची माहिती देण्याचे आदेश दिले होते. मात्र, अनेकांनी माहितीच सादर न केल्याने अंदाजपत्रक तयार होऊ शकले नव्हते. आता हे अंदाजपत्रक सोमवारी (दि. 7) ऑनलाइन पद्धतीने सादर होणार आहे. एकाच वर्षात दायित्व 1,200 कोटी : कोरोनामुळे दोन वर्षे महापालिकेच्या महसुलावर मोठा परिणाम झाला. परंतु, सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षांनीही आर्थिक स्थितीचा विचार न करताच गेल्या दोन वर्षांत केवळ होऊ द्या खर्च असेच काम ठेवल्याने दायित्व 2,800 कोटींपर्यंत पोहोचले आहे. गेल्या वर्षी हेच दायित्व 1,700 कोटींपर्यंत होते. त्यात यंदा 1,200 कोटींची भर पडली आहे.

केवळ 1,200 कोटींचा महसूल जमा
दोन वर्षांपूर्वी मनपाचे अंदाजपत्रक 1,854 कोटी होते. गेल्या वर्षी आयुक्तांनी मागील वर्षी 2,361 कोटींचे अंदाजपत्रक सादर केले. त्यात चालू वर्षाच्या अपेक्षित महसुलापोटी 2,109 कोटी, तर शिल्लक 253 कोटींचा समावेश होता. मात्र, डिसेंबर 2021 अखेरीस केवळ 1,200 कोटी जमा झाले. त्यात जीएसटीपोटी 915 कोटी, नगर नियोजनकडून 143, घरपट्टीच्या माध्यमातून 101 तर पाणीपट्टीतून 34 कोटी इतर उत्पन्नाव्दारे 15 कोटी तसेच मिळकतीतून 9 कोटींचा महसूल मिळाला. कोरोनामुळे 300 ते 400 कोटींची तूट यावेळी येण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे. असे असताना भाजपने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शहर विकासाच्या द़ृष्टीने अनेक कामे व प्रकल्प राबविले असून, उत्पन्नवाढीच्या द़ृष्टीने अनेक उपाययोजना केल्या आहेत. पुढील वर्षीदेखील जास्तीत जास्त विकासकामे केली जातील.
– गणेश गिते, सभापती

दैनिक पुढारीचे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रासाठीचे हे फेसबुक पेज.. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील विविध बातम्या, लेख, व्हिडिओ असे सगळं काही या पेजवर असेल. नाशिकच्या द्राक्ष्यांचा गोडवा आणि मिसळचा झणझणीतपणा एकाच वेळी देण्याचा प्रयत्न आमची टीम करत आहे. त्यामुळे नक्की लाईक करा आणि फॉलो करा.. मंडळ आभारी आहे.. 😃 पेज लाईक करण्यासाठी येथे क्लिक करा.

हेही वाचा :

Back to top button