सोलापूर महानगरपालिका प्रारूप रचनेतील प्रभाग 10 वर हरकत | पुढारी

सोलापूर महानगरपालिका प्रारूप रचनेतील प्रभाग 10 वर हरकत

सोलापूर पुढारी वृत्तसेवा:

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना जाहीर होताच यासंदर्भात सूचना व हरकती घेण्यास सुरुवात झाली आहे. आराखड्यातील प्रभाग क्र. 10 आणि 11 च्या प्रारूप नकाशा व व्याप्तीबाबत हरकत घेतली आहे. प्रभाग क्र. 10 मधील अभौगोलिक भाग व परिसर कमी करून तो कमी केलेला भाग व परिसर प्रभाग क्र. 11 मध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी छावा संघटनेचे योगेश पवार यांनी केली आहे. त्यांनी ही तक्रार राज्य निवडणूक आयुक्‍त, महापालिका आयुक्‍त आणि सोलापूर निवडणूक कार्यालयाकडे केली आहे.
या हरकतीमध्ये म्हटले आहे की, प्रारूप प्रभाग रचना ही सदोष असून, यात राजकीयपक्ष व विद्यमान नगरसेवकांचा हस्तक्षेप झालेला आहे.

प्रभाग क्र. 10 आणि 11 याची भौगोलिक परिस्थिती, हद्दीतून जाणारा रेल्वेमार्ग, लोहमार्ग आणि बोगदा, प्रभागातून जाणारे प्रमुख मोठे रस्ते आणि प्रभागातील लोकसंख्येचा विचार न करता प्रभाग क्र. 10 आणि 11 ची बेकायदेशीरपणे अभौगोलिक प्रभाग रचना केली आहे. तसेच प्रभाग क्र. 10 आणि 11 ची प्रारूप प्रभाग रचना करताना राज्य निवडणूक आयोगाने दि. 3 मे 2005 रोजी दिलेल्या आदेशाचे आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे सरार्सपणे उल्लंघन झाले आहे.प्रभाग क्र. 10 मध्ये समाविष्ट असणारा परिसर रेल्वेमार्ग, लोहमार्गामुळे दोन भागात विभागला असून 86 टक्के लोकसंख्येचा भाग व परिसर लोहमार्गाच्या पश्चिमेकडील आहे, तर फक्‍त 14 टक्के लोकसंख्येचा भाग व परिसर लोहमार्गाच्या पूर्वेकडील आहे. थोडक्यात प्रारूप प्रभाग क्र. 10 हा लोहमार्गाच्या पश्चिमेकडे 86 टक्के, तर पूर्वेकडे 14 टक्के याप्रमाणे नैसर्गिक व भौगोलिकदृष्ट्या स्पष्ट व ठळकपणे विभागलेला आहे. त्यामुळे ही रचना बेकायदेशीर आहे.

प्रभाग क्र. 10 मधील लोहमार्गाच्या पूर्वेकडील भाग व परिसर, प्रभाग क्र. 10 मधून कमी करून सदरचा भाग व परिसर प्रभाग क्र. 11 मध्ये समाविष्ट करून प्रभाग क्र. 10 व प्रभाग 11 ची नियमाप्रमाणे भौगोलिकदृष्टया सलग व कॉम्पॅक्ट पध्दतीने नव्याने प्रभाग रचना करण्यात यावी, अशी मागण पवार यांनी केली आहे. प्रभाग क्र. 11 बाबत पवार यांनी म्हटले आहे की, लोकसंख्येच्या दृष्टीने या प्रभागाची रचना बेकायदेशीर आहे. रचना करताना राज्य निवडणूक आयोगाच्या लोकसंख्येबाबतच्या नियमांचे पालन केलेले नाही. कारण नियमाप्रमाणे प्रभाग क्र. 11 ची लोकसंख्या ही कमीत-कमी 22 हजार 737 इतकी पाहिजे. असे असतानाही प्रभाग क्र. 11 चा लोहमार्गापर्यंतचा सलग भाग व परिसर तोडून तो भाग प्रभाग क्र. 10 मध्ये समाविष्ट केल्यामुळे प्रभाग क्र. 11 ची लोकसंख्या कमीत-कमीपेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळे प्रभाग क्र. 10 चा लोहमार्गाच्या पूर्वेकडील जवळपास 3 हजार 800 लोकसंख्या असणारा भाग व परिसर प्रभाग क्र. 11 मध्ये जोडण्यात यावा.या हरकतीनुसार प्रभाग क्र. 10 आणि 11 च्या प्रभाग रचनेत बदल नाही केल्यास उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही पवार यांनी दिला आहे.

हेही वाचलत का?

Back to top button