अंतराळात आहे पृथ्वीचा ‘सोबती’! | पुढारी

अंतराळात आहे पृथ्वीचा ‘सोबती’!

स्टॉकहोम : खगोलशास्त्रज्ञांनी अतिशय तप्त अशा बाह्यग्रहाचा शोध लावला आहे. हा ‘अल्ट्रा-हॉट एक्झोप्लॅनेट’ आपल्या ग्रहमालिकेतील गुरूसारखा असला तरी त्याचे तापमान तब्बल 3200 अंश सेल्सिअस इतके आहे. विशेष म्हणजे या ग्रहावर पृथ्वीसारखेच वैशिष्ट्यपूर्ण व विविध स्तरांचे वातावरण आहे.

स्वीडन आणि स्वित्झर्लंडच्या तज्ज्ञांनी हाय-रिझोल्यूशन स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करून या बाह्यग्रहाचा शोध लावला. या बाह्यग्रहाला ‘वास्प-189 बी’ असे नाव देण्यात आले आहे. त्याच्यावरील वातावरण अत्यंत गुंतागुंतीचे आणि विचित्र असल्याचे आढळून आले. आपल्या ग्रहमालिकेतील गुरू हा ग्रह आकाराने अतिशय मोठा व निव्वळ वायूचा गोळा आहे. हा बाह्यग्रहही एक वायूचा गोळाच असून तो पृथ्वीपासून 322 प्रकाशवर्ष अंतरावर आहे. ‘वाईड अँगल सर्च फॉर प्लॅनेटस्’ (वास्प) या प्रकल्पांतर्गत त्याचा शोध लावण्यात आला.

हा ग्रह ‘एचडी 133112’ या तार्‍याभोवती प्रदक्षिणा करतो. त्याच्या वातावरणात टायटॅनियम ऑक्साईड, लोह, टायटॅनियम, क्रोमियम, वॅनेडियम, मॅग्नेशियम आणि मँगेनिजचे एक ‘अनोखे कॉकटेल’ आहे.

या ग्रहाचा पृष्ठभाग इतका उष्ण आहे की तिथे लोखंडाचीही क्षणात वाफ होऊन जाईल. गुरूपेक्षा दीडपट मोठा असलेला हा ग्रह सूर्य आणि पृथ्वीमधील अंतराचा विचार करता आपल्या तार्‍यापासून वीस पट अधिक जवळ आहे. तेथील एक वर्ष केवळ 2.7 दिवसांचे आहे. याचा अर्थ अवघ्या 2.7 दिवसांतच हा ग्रह आपल्या तार्‍याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.

हेही वाचा

Back to top button