

पुणे: फुगेवाडी आणि हडपसर परिसरात विषारी दारूमुळे 19 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर प्रशासनाला जाग आली असून, अवैध धंद्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागरिकांचे बळी गेल्यावरच प्रशासनाला हातभट्ट्या दिसतात, मग इतर वेळेस त्यांच्याकडे डोळेझाक का केली जाते?, असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर उपनगरांतील हातभट्टीच्या विळख्याचा दै. ‘पुढारी’ने घेतलेला हा आढावा.
पोलिसांच्या कृपादृष्टीने फोफावले अवैध धंदे!
हडपसर परिसरात विषारी दारूमुळे सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे हडपसर परिसरात शोककाळा पसरली आहे. पांढरे मळा, हिंगणे आळी, काळेपडळ भागातील मोलमजुरी करणारे विषारी दारूचे बळी ठरले आहेत. पोलिसांच्या कृपादृष्टीने परिसरात हातभट्टीचा व्यवसाय फोफावल्याची भावना नागरिकांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केली.
परिसरातील झोपडपट्ट्यांलगत रसायनमिश्रित हातभट्टी दारू बनवली जाते. हडपसर, हांडेवाडी रोड, उरुळी देवाची, उरुळी कांचन, लोणी काळभोर, वडकी, फुरसुंगी, शेवाळवाडी, मांजरी, साडेसातनळी, केशवनगर, बी. टी. कवडे रोड परिसरातील शिंदेवस्ती, रामटेकडी परिसरातील गोसावीवस्ती आदी भागांत गेल्या काही महिन्यांपासून हातभट्टीचा व्यवसाय फोफावला आहे. चिरीमिरी घेणारी पोलिस यंत्रणाच परिसरात अवैध व्यवसायवाढीला जबाबदार आहेत. हातभट्टी व्यावसायिकांकडून पोलिस हप्ते वसूल करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
हडपसर परिसरात रात्रंदिवस पेट्रोलिंग सुरू असल्याचे पोलिस अधिकारी सांगत आहेत. मग या भागात खुल्लेआम हातभट्टीचा व्यवसाय कसा फोफावला, असा सवालही नागरिक उपस्थित करीत आहेत. ‘सद्रक्षणाय खलनिग््राहणाय’ या बीदवाक्याप्रमाणे पोलिसांनी कर्तव्य बजाबले असते, तर कदाचीत बळी गेलेल्याचे जीव वाचू शकले असते, अशी भावनाही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, हातभट्टीविरोधात नागरिक आता आक्रमक झाले असून, अवैध धंदे उद्ध्वस्त करण्यासाठी सरसावले आहेत.
हातभट्टीचे गुत्ते रात्रीच्या वेळी सक्रिय
धनकवडी, आंबेगाव पठार, सहकारनगर परिसरात हातभट्टीचे गुत्ते रात्रीच्या वेळी सक्रिय असतात. हातावर पोट असणारे मजूर आणि कष्टकरी वर्ग स्वस्तात मिळणाऱ्या गावठी दारूच्या आहारी जात असून, अनेकांची कुटुंबेही उद्ध्वस्त झाल्याची उदाहरणे आहेत.
पोलिसांकडून या भागात हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापेमारी केली जात आहे. परंतु, पोलिसांची गाडी गेल्यानंतर पुन्हा अवैध धंद्यांना ऊत येत आहे. पोलिसांनी केवळ तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी उपायोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
पतित पावन संघटनेचे विजय क्षीरसागर म्हणाले, की परिसरातील अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होण्यासाठी ठोस कारवाई होणे गरजेचे आहे. हातभट्टीची विक्री पूर्णपणे बंद होण्यासाठी आमची संघटना प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.
अडड््यांवर तळीरामांची सायंकाळी गर्दी
मुंढवा, घोरपडी आणि केशवनगर परिसरातील झोपडपट्टी भागात हातभट्टी आणि देशी दारूची विक्री होत आहे. सायंकाळी सहानंतर या अड्ड्यांवर तळीरामांची मोठी गर्दी होत आहे. परिसरातील हातभट्टी अड्ड्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. फुगेवाडी आणि हडपसर परिसरात दोन दिवसांपूर्वी विषारी दारूमुळे काही लोकांचे बळी गेल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंढवा येथील सर्वोदय कॉलनी, केशवनगर येथील गायरान वस्ती, घोरपडी येथील भीमनगर, विकासनगर व रामनगर आदी भागांत हातभट्टीच्या दारूची विक्री होते. या ठिकाणी लोणी काळभोर परिसरातून हातभट्टीची दारू आणली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
गेल्या वर्षी बिअर व वाइनच्या दरामध्ये मोठी वाढ झाली. त्यामुळे दररोज बिअर किंवा वाइन घेणारे लोकही आता कमी किमतीमध्ये मिळणाऱ्या हातभट्टी आणि देशी दारूकडे वळू लागले आहेत. दिवसभर मोलमजुरी करून सायंकाळी हातभट्टी आणि देशी दारू पिऊन घरी जाणाऱ्या कामगारांचे प्रमाण यात जास्त आहे. दारूमुळे स्वतःच्या शरीराचे तर वाटोळे होतच आहे; पण दारूवर पैसे उधळल्याने त्यांच्या संसाराची व मुलाबाळांच्या शिक्षणाचीही हेळसांड होत असल्याने महिलावर्गामध्ये याविषयी प्रचंड रोष आहे.
नियमित कारवाई, मग विक्री होते कशी?
दक्षिण पुण्यातील कात्रज, आंबेगाव परिसरामध्ये अवैध दारूधंद्यांवर नियमित कारवाई केली जात असल्याचे पोलिस सांगत आहे. मात्र, आंबेगाव पठार, श्रीधरनगर, गुजरवाडी फाटा, शनिनगरमध्ये काही ठिकाणी दारू विक्री होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
भारती विद्यापीठ पोलिसांनी गेल्या सहा महिन्यांत अवैध दारू धंद्यांवर कारवाई करून एकूण 19 गुन्हे दाखल केले आहेत. तसेच हजारो रुपयांची गावठी दारू, रसायन आणि वाहतुकीसाठी वापरलेली वाहनेही जप्त करण्यात आली. आंबेगाव पोलिसांनी देखील विविध ठिकाणचे दारू अड्डे उद्ध्वस्त केल्याची माहिती दिली. मात्र, आंबेगाव पठार, श्रीधरनगर, गुजरवाडी फाटा, शनिनगरमधील काही ठिकाणी गावठी दारूची चोरून विक्री होत असल्याचे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. हातभट्टीची विक्री रोखण्यासाठी ग््राामीण भागातून शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यांवर आणि अंतर्गत डोंगराळ मार्गांवर पोलिसांनी गस्त वाढवणे आवश्यक आहे. कारण गावठी दारू छुप्या मार्गाने किंवा पोलिसांना चकवा देऊन ग््राामीण भागातून परिसरात आणली जात आहे. यामुळे छुप्या पद्धतीने होणारी वाहतूक थांबून पोलिसांनी या दारूच्या विक्रीला लागम घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वडगाव बुद्रुक परिसरात पिशव्यांमधून विक्री
नऱ्हे, धायरी परिसर हातभट्टी मुक्त झालाचे चित्र दिसून येत आहे. मात्र, वडगाव बुद्रुक परिसरातील निवृत्तीनगर आणि जाधवनगर भागांत हातभट्टी दारूची विक्री होत आहे. ही दारू खडकवासला व बावधन परिसरातून आणली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. वडगाव बुद्रुक परिसरातील काही ठराविक ठिकाणी प्लॅस्टिक पिशव्यांमधून गावठी दारूची किरकोळ विक्री केली जात आहे. रिक्षा आणि दुचाकीवरून ही दारू ग््रााहकांपर्यंत पोहोचवली जात आहे. दारू विक्रीची ठिकाणे वेळोवेळी बदलली जातात. याबाबत मद्यपींना माहिती मिळण्याची व्यवस्था केली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.
पिढीजात दारूचे गुत्ते राजरोसपणे सुरूच
येरवडा येथील कंजारभाट, पांडू लमाणवस्ती, कामराजनगर परिसरात वर्षानुवर्षे पिढीजात दारूचे गुत्ते सुरू आहेत. यात काही गुत्ते बिटिश काळापासून सुरू आहेत. तळीराम दिवसरात्र रस्त्याच्या कडेला नशेत पडलेल्याचे चित्र दररोजच दिसून येत आहे. नियमितपणे कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिस सांगत आहे. मात्र, परिसरात अवैध दारू विक्री सुरूच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. येरवडा परिसरात वाढती गुन्हेगारी आणि खुलेआम मिळणारी हातभट्टी, हे विषय नेहमीच चर्चेत राहिले आहे. तळीरामांचा उपद्रव महिला आणि नागरिकांना दररोजच सहन करावा लागत आहे. परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी काही महिन्यांपूर्वी नव्याने लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याची निर्मिती करण्यात आली.
परंतु, तरीही गुन्हेगारी कमी झाली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी परिसरातील अवैध धंदे तातडीने बंद करावेत, अशी मागणी शिवसेनेचे शहर संघटक आनंद गोयल यांनी केली आहे. ताडीवाला भागातील खड्डा झोपडपट्टी, नदीपात्र, नायडू रुग्णालय परिसरात अवैध दारू विक्री होत आहे. तसेच, साधू वासवानी पुलाखाली, क्वीन्स गार्डन रेल्वे परिसर, कल्याणीनगर पूल परिसरात गावठी दारूची विक्री सर्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दारूमुळे परिसरातील अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तसेच अफू, गांजासह इतर नशेच्या पदार्थांची विक्री परिसरातील टपऱ्यांवर होत आहे.
महंमदवाडी परिसरात ‘रात्रीस खेळ चाले’
विषारी दारूमुळे फुगेवाडी, पांढरेमळा, ससाणेनगर परिसरात नुकतेचा 19 जणांचा मृत्यू झाला. यामुळे कोंढवा खुर्द, वानवडी, महंमदवाडी परिसरात अनेक ठिकाणी हातभट्टीची छुप्या पद्धतीने सुरू असलेली विक्री सध्या बंद असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, यापूर्वी या भागात रात्रीच्या वेळी गावठी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू होता, असे नागरिक सांगत आहेत.
विषारी दारूमुळे फुगेवाडी, पांढरे मळा, ससाणेनगर परिसरात नुकतेचा 19 जणांचा मृत्यू झाला. यामुळे हातभट्टी व्यावसायिकांसह तळीरामांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोंढवा खुर्द, वानवडी, महंमदवाडी परिसरात हातभट्टीसाठी आता जागा शिल्लक नसल्याने महापालिकेच्या हद्दीबाहेर हातभट्ट्या चालविल्या जात असून, रात्रीच्या वेळी कॅनमध्ये भरून या भागात दारूची वाहतूक केली जात आहे. मात्र, सध्या हातभट्टी विक्रीचा व्यवसाय बंद पडल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून काही हातभट्टी व्यवसाय बंद करण्यात पोलिसांना यश आले असले तरी छुप्या पद्धतीने हातभट्टीची विक्री सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, तळीरामांची कायम गर्दी असलेल्या महंमदवाडीतील कंजारभाट परिसरात सध्या शांतता पसरली आहे.
धानोरीत अल्पवयीन मुलेही व्यसनाधीन!
विश्रांतवाडी, धानोरीतील मुंजाबावस्ती व लोहगाव परिसरात अवैध दारू विक्रीबाबत नागरिकांच्या नेहमीच तक्रारी येतात. धानोरीत अल्पवयीन मुलेही व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढल्याने गुन्हेगारीत वाढ होत आहे. अवैध दारू विक्री परिसरातील महिला, पालक आणि नागरिकांची डोकेदुखी बनला आहे.
विश्रांतवाडी, धानोरी, लोहगाव परिसरातील वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्याबाबात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन गेल्या 21 मे रोजी मुंजाबावस्ती येथे नगरसेवक अनिल टिंगरे यांच्या पुढाकाराने नागरिक आणि पोलिस यांच्या समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गुन्हेगारी व अवैध धंदे रोखण्यासाठी पुढील दहा दिवसांत विशेष मोहीम राबविण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले होते. त्यामुळे परिसरातील अवैध दारू विक्रीवर परिणाम झाल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.
परिसरातील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलिसांनी केवळ तात्पुरती कारवाई न करता कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात आणि परिसरात मागील अनेक वर्षांपासून होणारी अवैध दारूविक्री बंद करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.