Pune Illegal Liquor Sale: पुण्यात विषारी दारूकांडानंतरही अवैध दारूविक्री सुरू; 19 मृत्यूंनंतरही धंदा बिनधास्त

गोखलेनगर, जनवाडीत सहा ठिकाणी अवैध विक्रीचे वास्तव उघड; फुगेवाडीतील 14 कुटुंबांवर शोककळा
Liquor
LiquorPudhari
Published on
Updated on

पुणे: हडपसर आणि फुगेवाडी येथे विषारी हातभट्टीची दारू पिऊन 19 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शहरातील काही भागांमध्ये अवैध दारू विक्रीचा व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गोखलेनगर, जनवाडी परिसरात ‌’पुढारी‌’च्या प्रतिनिधीने पाहणी केली. काही ठिकाणी गाडीवरून, तर काही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन केलेल्या पाहणीत 6 ठिकाणी दारू विकली जात असल्याचे आढळले. काही ठिकाणी लपूनछपून, तर काही ठिकाणी घरांमधूनच ग््रााहकांना दारू पुरविली जात होती. पोलिसांच्या अलीकडील कारवाईनंतर विक्रेत्यां मध्ये भीतीचे वातावरण असले, तरी सावधगिरी बाळगत हा व्यवसाय सुरूच असल्याचे दिसून आले.

Liquor
Uruli Kanchan Poisonous Liquor Death: उरुळी कांचनमध्ये विषारी दारूमुळे मृत्यू? 22 बळींनंतर रॅकेटचे कनेक्शन उघड

हातभट्टीचा असा आहे दर

स्थानिकांच्या माहितीनुसार, हातभट्टीची दारू ‌’हाफ ग्लास‌’ 40 रुपये आणि ‌’फुल ग्लास‌’ 70 रुपयांना विकला जातो. काही ठिकाणी ग््रााहक छोट्या बॉटलमधून ही दारू घेतात. तर काही ठिकाणी घरीच ग्लासमधून दारूची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, या भागात दारूची निर्मिती होत नसून, बाहेरून कॅनद्वारे दारू आणली जाते. ही वाहतूक प्रामुख्याने रात्री केली जाते, असे स्थानिकांनी सांगितले.

Liquor
Shirur Illegal Liquor System: शिरूरमध्ये गावठी दारूवर कारवाईचा दिखावा? यंत्रणेतील त्रुटींमुळे आरोपी सुटत असल्याचा आरोप

पैसे द्या ग्लास घ्या; अशी होते विक्री

दुपारी 3 च्या सुमारास गोखलेनगर पंपिंग स्टेशनजवळ पाहणी केल्यास एका टपरीवर दारू विकली जात असल्याचे आढळले. दुपार असल्याने टपरी बंद होती. मात्र, आतून काही जण दारू विक्री करत होते. कालच्या घटनेमुळे अतिशय सावध पद्धतीने ही विक्री होत होती. याच ठिकाणापासून काही अंतरावर एक घरात व्यवसाय हा सुरू असल्याचे कळाले. कुणाला संशय न येता गुत्त्‌‍याजवळ गेल्यावर काही महिला या व्यवसायात सहभागी असल्याचे दिसले. दारू पिणारा व्यक्ती थेट घरी जाऊन कॅश पैसे देऊन दारूची मागणी करत असल्याचे आढळले. त्याला त्याच ठिकाणी एका ग्लासमध्ये दारू दिली गेली. संबंधित व्यक्ती तेथेच काही वेळांत ग्लास रिकामा करून तेथून निघून गेला. यानंतर ताराबाई उद्यानासमोरील एका टपरीतूनही दारू विकली जात असल्याचे आढळले. जनवाडीतील पीएमसी कॉलनी परिसरातील एक केंद्र बंद असले, तरी जनता वसाहतीत दोन ठिकाणी अवैधरीत्या दारूविक्री सुरू होती.

Liquor
Hadapsar Illegal Liquor Deaths: हडपसरमध्ये विषारी दारूचा अड्डा उघड; 6 मृत्यूनंतर पोलिसांवर गंभीर आरोप

आई... बाबा कधी उठणार?

विषारी दारूने केवळ 14 निष्पाप जिवांचा बळी घेतला नाही, तर एका संसाराची राखरांगोळी केली आहे. छत्तीसगडहून स्वप्नांचे ओझे घेऊन पुण्यात रोजगारासाठी आलेले लेबर कॅम्पमध्ये कष्टाचे काम करणारे राजेंद्र टप्पो (वय 36) हे फुगेवाडीत राहत होते. विषारी दारूमुळे दुर्दैवी मृत्यू झाला असून, मागे उरलेला त्यांच्या कुटुंबाचा आक्रोश पाहून दगडलाही पाझर फुटेल. लहान मुलगा सातत्याने आई बाबा कधी उठणार? असा प्रश्न करत आहे, परंतु आई नि:शब्द झाली आहे.

माझा नवरा परत करा, आता मी मुलाला काय सांगू?

राजेंद्र यांच्या निधनानंतर त्यांची 26 वर्षीय पत्नी मंजू टप्पो यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजेंद्र यांना विषारी दारू प्यायल्यामुळे काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्रभर मंजूने देवाकडे साकडं घातलं, पण आज नियतीने तिचा संसार कायमचा उद्ध्वस्त केला. राजेंद्र यांचे पार्थिव फुगेवाडीतील त्यांच्या राहत्या घरी आणताच मंजूने जो आक्रोश केला, तो पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. मला माझा नवरा परत हवा आहे, मी या चिमुकल्याला आता काय सांगू? तिचे हे शब्द उपस्थितांचे काळीज पिळवटून काढणारे आहेत.

Liquor
Illegal Liquor Network: उरुळी कांचनमध्ये विषारी दारूचे जाळे? 50 वर्षांपासून अवैध धंद्याचे आरोप

बाबांना उठव ना म्हणणारा 4 वर्षांचा रिषभ

एकीकडे मंजूचा हंबरडा, तर दुसरीकडे 4 वर्षांचा निरागस रिषभ. त्याला अजूनही कळेनासे झाले आहे की, बाबांना आता कधीच जाग येणार नाही. तो आपल्या लाडक्या बाबांना स्पर्श करत, त्यांना हलवत म्हणतोय, आई, बाबांना उठव ना... बाबा खूप वेळ झोपले

आहेत, मुलाचा हा प्रश्न ऐकून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे ओलावले आहेत. ज्या बापाने आपल्या मुलाच्या भविष्यासाठी छत्तीसगड सोडले आणि फुगेवाडीच्या लेबर कॅम्पमध्ये हलाखीचे कष्ट उपसले, तोच बाप आता कायमचा सोडून गेला आहे.

14 घरे, 14 निराधार परिवार

ही वेदना केवळ एका कुटुंबाची नाही. फुगेवाडीतील या लेबर कॅम्पमध्ये आज 14 घरांचे दिवे विझले आहेत. ज्या हातांनी या शहराच्या विकासासाठी काबाडकष्ट केले, तेच हात आज विषारी दारूच्या धंद्यामुळे निर्जीव झाले आहेत. प्रशासनाचा ढिम्म कारभार आणि अवैध दारू विक्रीकडे केलेले दुर्लक्ष, हे या नरसंहाराचे मुख्य कारण ठरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news