Pune Methanol Liquor Case: विषारी दारूकांडानंतर मोठी कारवाई; 645 लिटर गावठी दारू जप्त, उत्पादन शुल्क विभागातील 13 जण निलंबित

पुणे-पिंपरीतील 17 मृत्यूंनंतर छापेमारी; मुख्य सूत्रधारासह 10 आरोपी अटकेत, मिथेनॉल मिश्रणाचा संशय
Liquor
LiquorPudhari
Published on
Updated on

पुणे: मिथेनॉलमिश्रित विषारी दारू प्यायल्याने पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील 17 जणांचे मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने (स्टेट एक्ससाईज) शनिवारी विविध भागांतील दारू गुत्त्यांवर छापेमारी केली. या कारवाईत 645 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली असून, गावठी दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.

Liquor
Pune Illegal Liquor Sale: पुण्यात विषारी दारूकांडानंतरही अवैध दारूविक्री सुरू; 19 मृत्यूंनंतरही धंदा बिनधास्त

गावठी दारूप्रकरणात पोलिसांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातून दहा जणांना अटक केली. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार योगेश राजेंद्र व्हानकडे ऊर्फ सिकंदर राठोड (वय 23, रा. मुंढवा), राधेशाम हरिराम प्रजापती (वय 35, रा. ऊरळी कांचन, पुणे-सोलापूर रस्ता), कर्नेलसिंग तखतसिंह विरका (वय 73), गुरुमंगतसिंह कर्नेलसिंग विरका (वय 45, दोघे रा. फुगेवाडी) यांच्यासह दहा जणांना अटक करण्यात आली. दापोडी आणि हडपसर पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

या घटनेची गंभीर दखल घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागातील 14 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तसेच पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी विषारी दारू प्रकरणात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास दिरंगाई केल्याचा ठपका ठेवून हडपसर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय मोगले, सहायक निरीक्षक हसीना शिकलगार, उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

Liquor
Uruli Kanchan Poisonous Liquor Death: उरुळी कांचनमध्ये विषारी दारूमुळे मृत्यू? 22 बळींनंतर रॅकेटचे कनेक्शन उघड

विषारी दारूप्रकरण उघडकीस आल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी वेगवेगळ्या भागांत छापे टाकले. रुग्णालयात जाऊन नातेवाईक, तसेच वैद्यकीय तज्ज्ञांची भेट घेतली. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून 645 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. विषारी दारूप्रकरणा तील मुख्य आरोपींची चौकशी करण्यात आली. हडपसरमधील पांढरेमळा परिसरात छापा टाकण्यात आला. आकाश जाधव याच्याकडून 70 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली. दापोडीतील पवारवस्ती परिसरात छापा टाकून इरफान कुरेशी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 155 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.

Liquor
Shirur Illegal Liquor System: शिरूरमध्ये गावठी दारूवर कारवाईचा दिखावा? यंत्रणेतील त्रुटींमुळे आरोपी सुटत असल्याचा आरोप

पुण्यातील शिवाजीनगर भागातील वडारवाडी येथे छापा टाकून आर्यन धोत्रे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 420 लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. उत्पादन शुल्क विभागाने 645 लिटर गावठी दारू जप्त केली आहे. गावठी दारू विक्रीप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गावठी दारूत मिथेनॉल मिसळल्याचा संशय असून, गावठी दारूचे नमुने तपासणीसाठी न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गावठी दारू विक्रीतून जादा फायदा व्हावा, तसेच दारू पिणााऱ्यांना नशा व्हावी, यासाठी मुख्य सूत्रधार योगेश व्हानकडेने त्यात अत्यंत घातक असे मिथेनॉल रसायन मिसळले, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. व्हानकडेने मुंबईहून ऑनलाइन पद्धतीने मिथेनॉल मागविल्याची माहिती तपासात मिळाली आहे.

वर्षभरात सहा हजार गुन्हे

‌‘उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारू विक्रीप्रकरणात गेल्या वर्षी सहा हजार 642 गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींकडून 29 कोटी 74 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गावठी दारू विक्रीप्रकरणात गेल्या वर्षी पाच दारू विक्रेत्यांविरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली आहे. त्यांना कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन सखोल तपास करण्यात येत आहे. गावठी दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे‌’, अशी माहिती उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली आहे.

Liquor
Hadapsar Illegal Liquor Deaths: हडपसरमध्ये विषारी दारूचा अड्डा उघड; 6 मृत्यूनंतर पोलिसांवर गंभीर आरोप

13 अधिकारी-कर्मचारी निलंबित

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निलंबनानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाने देखील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. मिथेनॉल मिश्रित विषारी दारू प्यायल्याने पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 17 जणांचा मृत्यू झाला, तर चार ते पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागातील 13 अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. अवैध दारूविक्रीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात त्रुटी राहिल्याचे निरीक्षण नोंदवत त्यांना निलंबित केले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांनी याबाबतचे आदेश दिले. विषारी दारूमुळे पुण्यातील हडपसर आणि पिंपरीतील फुगेवाडी भागातील 17 नागरिकांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी हडपसर आणि दापोडी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक, कर्मचाऱ्यांसह 9 जणांवर निलंबनाची कारवाई केली होती. त्यानंतर आता उत्पादन शुल्क विभागातील 13 जणांना निलंबित केले आहे. फुगेवाडी, दापोडी, पांढरेमळा, हडपसर आणि परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायाकडे संबंधित अधिकाऱ्यांनी सातत्याने दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. वारंवार तक्रारी, गुन्हे आणि माहिती उपलब्ध असतानाही आरोपींवर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई केली नसल्याने मिथेनॉलमिश्रित गावठी दारू अनेकांच्या जीवावर बेतल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील अवैध दारू व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यात कसूर केला. नियमित गस्त, माहिती संकलन, गुन्हे नोंदविणे आणि सराईत आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना निलंबित करून शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आल्याचे आयुक्त देशमुख यांनी आदेशात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news