

पुणे: शहराच्या काही भागात सोमवारी जोरदार पावसाने दाणादाण उडवून दिली. या पावसाने रस्त्यांवर तळी साचली तर अठरा ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडल्याने अग्निशमन दलाच्या जवानांसह वाहतूक पोलिसांची एकच धावपळ झाली. रस्त्यांवर झाडे उन्मळून पडल्याने वाहतूक कोंडी झाली होती. शिवाजीनगर भागात सरासरी १२.७ मि.मी. पावसाची नोंद झाली.
शहरात गणपती विसर्जनाच्या दिवशी दि. २५ सप्टेंबर रोजी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. मात्र, त्या दिवशी पाऊस झाला नाही. उलट उन्हाचा तडाखा वाढला. तापलेल्या उन्हामुळे पुणेकर हैराण झाले होते.
आता पाऊस संपला असे वाटत असताच सोमवारी अचानक आकाश काळ्याभोर ढगांनी भरुन आले अन् दुपारी ३ ते ३.३० या वेळेत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्याचा जोर इतका होता की, अनेक दुकानांवरील पत्रे उडून गेले. तसेच अनेक भागात झाडपडी झाली. रस्त्यांवर तळी साचली त्यामुळे चौकाचौकात भागात वाहतूक कोंडी झाली.
या पावसामुळे शहरात वाढलेला उष्णता एकदम कमी झाली. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उन्हाच्या तडाख्यातनू सूटका झाली. त्यामुळे अनेक नागरिक पावसाचा अनुभव घेण्यासाठी छत्री घेऊन बाहेर पडले. मात्र, चौकाचौकात वाहतूक कोंडीत ते अडकले.
शहरातील शिवाजीनगर, एनडीए, पाषाण, हडरसर, नगर रस्ता, मुकुंदनगर, सहकारनगर, महर्षीनगर, स्वारगेट, मित्रमंडळ चौक, शिवदर्शन, कर्वेनगर, गुरुवारपेठ, खडक पोलिस लाईन, सिंहगड रस्ता, बालेवाडी या भागात पावसाचा जोर होता. त्यामुळे या भागात झाडपडी मोठ्या प्रमाणावर झाली. उर्वरित भागात पाऊस झाला, मात्र तेथे फार जोर नव्हता.
सोमवारी शहरात झालेला पाऊस....
शिवाजीनगर १२.७, एनडीए १५, पाषाण २, अंबेगाव १.५, हडपसर १.५
या भागात झाली झाडपडी...(दुपारी ३ ते सायंकाळी ७ पर्यंत )
रास्तापेठ, मुकुंदनगर, सहकारनगर, महर्षीनगर, स्वारगेट, मिञमंडळ चौक, शिवदर्शन, कर्वेनगर, गुरुवारपेठ, खडक पोलिस लाईन, सिंहगड रस्ता, बालेवाडी.