

पुणे: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. मतदार यादीसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी आता १२ ऑक्टोबर २०२६पर्यंत मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. त्यामुळे मतदारांना नाव, पत्ता तसेच अन्य तपशिलांमधील त्रुटी दुरुस्त करून घेण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळणार आहे.
एसआयआर प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या नोंदी तपासण्यात येत आहेत. काही नोंदी 'अनमॅप्ड' किंवा तफावत असलेल्या म्हणून चिन्हांकित करण्यात आल्या आहेत. अशा मतदारांच्या घरी बूथ लेव्हल ऑफिसर भेट देऊन आवश्यक कागदपत्रे गोळा करणार आहेत. संबंधित कागदपत्रे ECINET पोर्टलवर अपलोड करून ती पुढील कार्यवाहीसाठी संबंधित निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठविण्यात येणार आहेत.
या प्रक्रियेसाठी प्रत्येक मतदाराला ERO किंवा सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. कागदपत्रांची छाननी करूनच पुढील कार्यवाही केली जाणार आहे. कागदपत्रे अपुरी, असमाधानकारक किंवा प्रकरणात विशेष बाब आढळल्यासच सुनावणी घेण्यात येणार आहे.
ही सुनावणी शक्यतो ऑनलाइन पद्धतीने घेण्याचे नियोजन आहे. आवश्यक असल्यास संबंधित मतदार आपल्या वतीने सुनावणीसाठी प्रौढ कुटुंबीयाला अधिकृत करू शकतो. दरम्यान, नोटिसा, दावे आणि हरकती निकाली काढण्याची मुदतही वाढविण्यात आली असून, आता १० नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
मतदारांनी घरपोच येणाऱ्या BLO कडून मागितली जाणारी कागदपत्रे तयार ठेवावीत. तसेच, मतदार यादीतील आपले नाव, पत्ता आणि इतर तपशील तपासावेत. नोंदीमध्ये काही तफावत आढळल्यास १२ ऑक्टोबरपूर्वी दावा किंवा हरकत दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळे मुदतवाढीचा लाभ घेत मतदारांनी आपली नोंद वेळेत तपासून आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी.