पुण्यात दिवसभर रिमझिम, रात्री संततधार

पुण्यात दिवसभर रिमझिम, रात्री संततधार

पुणे/ खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : शहरात रविवारी (दि. 23) दिवसभर अधूनमधून पावसाची रिमझिम सुरू होती. मात्र, रात्री आठनंतर उशिरापर्यंत पावसाचा जोर वाढला अन् सर्व रस्त्यांवर पाणी साचले. चिखल अन् पाण्यातून वाट काढताना वाहनचालकांची तारांबळ उडाली. रात्री 8.30 पर्यंत शहरात 2 मि. मी. पावसाची नोंद झाली होती. खडकवासला धरणसाखळीत पाण्याचा ओघ वाढला असून, रविवारी सायंकाळी पाणीसाठा 53.60 टक्के इतका झाला होता.

घाटमाथ्यावर 27 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट दिल्याने तेथे दरडी कोसळण्याचा धोका आहे, त्यामुळे नागरिकांनी त्या भागात फिरायला जाणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. शहरावर ढगांची गर्दी होत असली तरीही मोठा पाऊस पडलेला नाही. सतत रिमझिम पाऊस होत असल्याने हंगामात केवळ 170 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. अजून 100 मि. मी. पावसाची तूट आहे. हवेच्या वरच्या थरात वार्‍याचा वेग कमी असल्याने शहरात पाऊस वाढत नव्हता. मात्र, रविवारपासून पावसाने जोर धरला आहे.

'खडकवासला'त ओघ सुरूच…

पानशेत खोर्‍यातील दमदार पावसामुळे खडकवासला धरणसाखळीत पाण्याच्या पातळीत वाढ सुरूच आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे 29.15 टीएमसी क्षमतेच्या खडकवासला धरणसाखळीत 15.62 टीएमसी म्हणजे 53.60 टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. गेल्या 24 तासांत एक टीएमसीपेक्षा अधिक पाण्याची भर पडली. गेल्या वर्षी 23 जुलैला धरण साखळीत 69.19 टक्के पाणी होते.

शहरातील पाऊस (मिमी.मध्ये)
शिवाजीनगर :2
पाषाण : 3
चिंचवड : 3.6
लवळे :1.5
(रविवार रात्री 8 पर्यंत)

धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये (टक्केवारी)
टेमघर : 1.35 (36.50)
वरसगाव : 6.87 (53.59)
पानशेत : 6.09 (57.24)
खडकवासला : 1.24 (66.19)

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news