इर्शाळवाडी दुर्घटना : बचावकार्य थांबवले, 57 बेपत्ता घोषित; मृतांची संख्या सत्तावीस | पुढारी

इर्शाळवाडी दुर्घटना : बचावकार्य थांबवले, 57 बेपत्ता घोषित; मृतांची संख्या सत्तावीस

खोपोली (रायगड); पुढारी वृत्तसेवा :  इर्शाळवाडी दुर्घटनेतील बेपत्ता लोकांचा शोध घेण्याची मोहीम आणि बचावकार्य रविवारी थांबवण्यात आले. आतापर्यंतच्या शोधकार्यात एकूण 27 जणांचे मृतदेह सापडले आहेत. काही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने मृतदेहांचा शोध घेण्याचे कार्य थांबवण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त 57 जण बेपत्ता असल्याचे घोषित करण्यात आले आहे. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औपचारिकरीत्या बेपत्ता दुर्घटनाग्रस्तांना मृत घोषित करण्यात येईल, अशी माहिती रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इर्शाळवाडीवर कडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत आणि बेपत्ता लोकांची एकूण संख्या 84 असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेतून 141 नागरिक बचावले आहेत, असे रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी सांगितले; तर ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीवरून शोधमोहीम थांबविल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

तत्पूर्वी सामंत यांनी प्रशासनाशी चर्चा करून सर्व माहिती घेतली. त्यानंतर खालापूर पोलिस ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. पालकमंत्री सामंत म्हणाले, इर्शाळवाडी येथे 43 कुटुंबे वास्तव्यास होती. यातील दोन कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. 57 जण बेपत्ता आहेत; तर 27 मृतदेह सापडले आहेत. ग्रामस्थांनी केलेल्या विनंतीनुसार आता हे शोधकार्य थांबवण्यात येत आहे. आता या परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. बचावलेल्या 141 लोकांचे कंटेनरमध्ये तात्पुरते पुनर्वसन करण्यात येत आहे. या सर्वांना सिडकोच्या माध्यमातून घरे बांधून देण्यात येतील. गेले चार दिवस दुर्घटनास्थळी एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शोधमोहिमेत मोठा सहभाग नोंदवला. याबद्दल सामंत यांनी त्यांचे आभार मानले.

खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे बुधवारी, 19 जुलैच्या रात्री दरड कोसळल्याने अख्खी वाडी दरडीखाली दबली. अनेक ग्रामस्थ ढिगार्‍याखाली गाडले गेले. डोंगरकपारीत असलेल्या या वाडीकडे जाण्यासाठी रस्ताही नसल्याने तेथे वाहने पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे दरडीचा ढिगारा उपसण्याचे काम एनडीआरएफ, टीडीआरएफ पोलिस तसेच अग्निशमन दलाच्या जवानांची जिल्ह्यातील टीम आणि जिल्ह्यातील रेस्क्यू टीमच्या मदतीने 1100 लोक करीत होते.

गुरुवारी पहाटेपासून या ठिकाणी बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. गेले चार दिवस अव्याहतपणे मोहीम राबवण्यात आली. मात्र प्रचंड पाऊस आणि सोसाट्याच्या वार्‍यामुळे अडथळ्यांचा सामना करावा लागला. त्यातच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली. त्यामुळे ग्रामस्थांनीच ही शोधमोहीम थांबवण्याची विनंती प्रशासनाला केली. त्यानुसार ही मोहीम रविवारी थांबवण्यात आली.
पालकमंत्री सामंत यांच्या पत्रकार परिषदेवेळी आमदार महेश बालदी, महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते.

दरम्यान, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी या भागाला भेट दिली. येथील ग्रामस्थांना जाहीर केलेली मदत लवकरात लवकर देण्यात यावी. त्यांच्या पुनर्वसनाबरोबरच मुलांच्या शिक्षणाचा खर्चही करावा, अशी मागणी करतानाच केंद्र शासनाच्या माध्यमातूनही मदतीसाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

तळीयेतही केले होते 84 मृत घोषित

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 22 जुलै 2021 च्या मध्यरात्री डोंगरकडा कोसळून महाड तालुक्यातील तळीयेवाडी मातीखाली गडप झाली होती. त्यानंतर राज्य शासनाने ढिगारे उकरून 44 मृतदेह बाहेर काढले. पाचव्या दिवशी शोधमोहीम थांबवून 40 मृत घोषित करण्यात आले होते. त्यामुळे दरडीखाली सापडलेल्यांची संख्या 84 झाली होती. या मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी 5 लाख याप्रमाणे मदतही दिली. त्यानंतर म्हाडाकडून घरांचे बांधकाम करण्यात आले आहे. एकूण 66 घरे बांधण्यात आली असून त्यांचा ताबा देणे अद्याप बाकी आहे. तर इर्शाळवाडीचे पुनर्वसन सिडकोमार्फत करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

परिसरात जमावबंदी लागू

या भागात आता 144 कलमांतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली. येथे 24 तास पहारा ठेवण्यात येईल. त्यामुळे या ठिकाणी जाण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. यापुढे अशा घटना घडू नयेत, म्हणून प्रशासन पूर्ण खबरदारी घेईल, असेही पालकमंत्री सामंत म्हणाले.

Back to top button