पुणे : पीएमपी प्रशासनाचा लेटलतिफांना दणका! | पुढारी

पुणे : पीएमपी प्रशासनाचा लेटलतिफांना दणका!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पीएमपी प्रशासनाने कामावर सतत गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईचा मोठा बडगा उगारला असून, 36 निलंबित, 3 बडतर्फ आणि 142 कर्मचार्‍यांना कडक शब्दांत नोटिसा दिल्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यात 9 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी संख्या आहे. त्यातील सुमारे 200 कर्मचारी दोन महिन्यांत निलंबित झाले होते.

पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार घेतल्यानंतर कर्मचार्‍यांमधील बेशिस्त पाहायला मिळाली. त्यांनी स्वत: मार्गावर अनेकवेळा पाहाणी केली. त्यामुळे कर्मचार्‍यांना शिस्त लागावी आणि पुणेकर प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, याकरिता सिंह यांनी कर्मचार्‍यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. गाडी चालवताना फोनवर बोलणार्‍या चालकांना 1 हजार रुपयांचा दंड करण्यात येत आहे. बेशिस्त चालक-वाहकांची तक्रार करणार्‍या प्रवाशांना 100 रुपये बक्षीस देण्यात येत आहे. आता सतत गैरहजर राहणार्‍या कर्मचार्‍यांवर निलंबन, बडतर्फ आणि नोटिसा बजावून कारवाई करण्यात आली आहे.

अशी झाली कारवाई : निलंबित कर्मचार्‍यांमध्ये 30 वाहक व 6 चालकांचा समावेश आहे. तसेच, कोणतीही पूर्वसूचना न देता शनिवारी (दि.22) गैरहजर राहिलेल्या 142 कर्मचार्‍यांना कडक शब्दात नोटिसा (आरोपपत्र) देण्यात आल्या आहेत. नोटिसा देण्यात आलेल्यांमध्ये 78 वाहक व 64 चालकांचा समावेश आहे. याबरोबरच 2 चालक आणि वर्कशॉप विभागाकडील एका कर्मचार्‍यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

प्रवासीभिमुख सेवा मिळावी, प्रवाशांची गैरसोय होऊ नये.
ताफ्यातील जास्तीत जास्त बस मार्गांवर संचलनात उपलब्ध व्हाव्यात. कामात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांना शिस्त लागावी व कर्मचार्‍यांच्या गैरहजेरीच्या प्रमाणास आळा बसावा या दृष्टीने कर्मचार्‍यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

       – सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Back to top button