

पुणेः पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने आयोजित “पुणे ग्रँड टूर 2026” या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन 19 ते 24 जानेवारी 20 दरम्यान शहरात करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील प्रोलॉग रेस सोमवारी (दि. 19) शहरात होणार असून, त्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने शहराच्या मध्यवर्ती आणि पश्चिम भागातील रस्ते तब्बल 9 तास बंद रहाणार असल्याचे आदेश जारी केले आहेत. या वेळी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
त्याच बरोबर ही रेस ज्या रस्त्याने होणार आहे, त्या परिसरातील शाळा, महाविद्यालये, कॉलेज यांना देखील एकदिवशीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजीगनर घोले रोड, विश्रामबागवाडा कसबा, ढोले पाटील रोड, भवानी पेठ, औंध, बाणेर, कोथरूड,बावधन, सिंहगडरोड, वारजे कर्वेनगर या पुणे महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी असणार आहे. शनिवारी (दि.17) पोलिस आयुक्तालयात पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त (पुर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील आणि पोलिस उप-आयुक्त (वाहतूक) हिंमत जाधव यांनी याबाबत माहिती दिली.
स्पर्धेमुळे शहराची प्रतिमा जागतिक पातळीवर झळकणार आहे. हा स्वत:चा इव्हेंट समजून सहकार्य करा. सायकल स्पर्धेचा आंनद घेऊन स्पर्धा यशस्वी करा.
रंजन कुमार शर्मा, सह-पोलिस आयुक्त
या स्पर्धेचा एक टप्पा 23 जानेवारीला पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये असणार आहे. यामध्ये स्पर्धक 99 किलोमीटरचा टप्पा गाठतील, त्यातील 58 किलोमीटरचा भाग पुणे शहरातील असेल. यामुळे 23 तारखेलाही शहरांतर्गत वाहतूकीवर निर्बंध असतील. मात्र, वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. या दिवशी सुरवात बालेवाडीतून होऊन समारोप जंगली महाराज रस्त्यावरली झाशी राणी चौकात होणार आहे.
मनोज पाटील, अपर पोलिस आयुक्त
पुणे : ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’च्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 19) शहरातील प्रमुख भागांतील शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश दिले आहेत. या स्पर्धेतील ‘प्रोलॉग रेस’ सोमवारी पुणे शहरात होणार आहे. त्यानिमित्त सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत शहरातील प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहणार आहेत. यामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले (फर्ग्युसन महाविद्यालय) रस्ता, गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रस्ता (जे. एम. रोड) तसेच या मार्गांना जोडणारे उपरस्ते यांचा समावेश आहे.
रस्ते बंद राहिल्यामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना गैरसोय होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजीनगर-घोले रस्ता, विश्रामबागवाडा-कसबा, ढोले पाटील रस्ता, भवानी पेठ, औंध-बाणेर, कोथरूड-बावधन, सिंहगड रस्ता तसेच वारजे-कर्वेनगर या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये तसेच व्यावसायिक शिक्षण संस्था सोमवारी एका दिवसासाठी बंद राहणार आहेत.
वाहतूक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, या कालावधीत अनावश्यक प्रवास टाळावा. पर्यायी मार्गांचा वापर करावा व पोलिसांच्या सूचनांचे पालन करून स्पर्धा यशस्वी करण्यास सहकार्य करावे. स्पर्धा मार्गावर वास्तव्यास असलेल्या नागरिकांनी सकाळी 9 वाजतापूर्वीच आवश्यक त्या दैनंदिन वस्तूंची खरेदी करावी.
सोमवारी पार पडणाऱ्या पुणे ग्रँड टूरसाठी सायकल स्पर्धेसाठी 3 अपर पोलिस आयुक्त, 10 पोलिस उपायुक्त, 15 सहायक पोलिस आयुक्त, 50 पोलिस निरीक्षक,
200 सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक, 1600 पोलिस कर्मचारी यांच्यासह बाँम्ब शोधक व नाशक पथक आणि शीघ कृती दल बंदोबस्तावर असणार आहेत.
दल (क्युआरटी) ची पथके असा पोलिस बंदोबस्त राहणार आहे.
खंडोजी बाबा चौक ते गरवारे बीज ते गुडलक चौक मार्ग बंद
गुडलक चौक ते तुकाराम पादुका चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक ते ललित महल चौक ते चाफेकर चौक मार्ग बंद
चाफेकर चौक ते सूर्यमुखी दत्त मंदिर चौक ते रेंज हिल्स कॉर्नर येथे यू टर्न
रेंज हिल्स चौक ते सूर्यमुखी दत्त मंदिर चौक ते चाफेकर चौक ते सिमला ऑफीस चौक ते संचेती चौक बंद मार्ग
संचेती चौक ते स. गो. बर्वे चौक ते बालगंधर्व चौक ते डेक्कन जिमखाना बस डेपो
प्रोलॉग स्पर्धेदरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेशखिंड रोड, जंगली महाराज रोड तसेच त्यांना जोडणारे उपरस्ते पूर्णतः वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. या मार्गांवर अत्यावश्यक सेवेतील वाहने (रुग्णवाहिका, अग्निशमन दल, पोलिस वाहने आदी) वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी राहणार आहे.