

पुणे : पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यातील समस्त क्रीडाविश्वात प्रसिद्ध असणाऱ्या पुढारी राईज अप सीझन : 4’ मधील महिलांच्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेला शनिवारी (दि.17) उत्साहात सुरुवात झाली. लोकमान्य टिळक जलतरण तलाव, कर्वे रस्ता येथे या स्पर्धेचे उद्घाटन ‘व्हॅलेन्टिना वूमेन्स एपॉवरमेंट फाउंडेशन’च्या अध्यक्षा जयश्री संतोष बांदल आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या केसरी शाखा व्यवस्थापक श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा पुणे जिल्हा जलतरण संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या सहकार्याने आयोजित केली आहे.
जलतरण स्पर्धा 7 वर्षांखालील, 9 वर्षांखालील, 11 वर्षांखालील, 13 वर्षांखालील, 15 वर्षांखालील, 16 ते 20 वर्षांखालील, 21 ते 30 वर्षांखालील, 31 ते 40 वर्षे, 40 वर्षांपुढील, अशा एकूण 9 गटांमध्ये होणार आहे. या स्पर्धेतील प्रत्येक वयोगटातील प्रथम तीन विजेत्यांना ट्रॉफीज, मेड्लस, मेरिट सर्टिफिकेट आणि सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी खेळाडूंसह पालकांमध्ये ही मोठा उत्साह दिसून आला.
या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक माणिकचंद ऑक्सरिच असून, फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी, ॲकेडमिक पार्टनर सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट हे आहेत. सहप्रायोजक म्हणून अदानी, तर असोसिएटस पार्टनर म्हणून व्हॅलेन्टिना इंडस्ट्रीज यांचे सहकार्य मिळाले आहे. या स्पर्धेसाठी पुणे शहराबरोबरच पुणे जिल्हा आणि पिंपरी- चिंचवड येथून 250 हून अधिक महिला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
महिलांच्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे उद्घाटन करताना ‘व्हॅलेन्टिना वूमेन्स एपॉवरमेंट फाउंडेशन’च्या अध्यक्षा जयश्री संतोष बांदल, ‘लोकमान्य मल्टिपर्पज’चे शाखा व्यवस्थापक श्रीकांत देशपांडेसह इतर मान्यवर. दुसऱ्या छायाचित्रात जलतरण स्पर्धेतील सहभागी स्पर्धक.
दै. ‘पुढारी’च्या वतीने केवळ महिलांसाठी क्रीडा स्पर्धा आयोजित करीत मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. हा उपक्रम कौतुकास्पद आहे. स्पर्धा आयोजित करताना खेळाडूंना मोफत सहभाग दिला आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा महिला खेळाडूंसाठी महत्त्वाचे असून दै. ‘पुढारी’ने स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात आगामी काळातही आम्ही सहभागी होऊ.
श्रीकांत देशपांडे, केसरी शाखा व्यवस्थापक, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी
दै. ‘पुढारी’ माध्यम समूह एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिला खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे, ही खरीच अभिमानाची गोष्ट आहे. अशा स्पर्धांच्या माध्यमातून खेळाडूंना स्पर्धेत मोफत प्रवेश दिला जातो, ही गौरवाची बाब आहे. महिला खेळाडूंना पुढे आणण्यासाठी अशा स्पर्धा होणे गरजेचे असून दै. ‘पुढारी’ने यात पुढाकार घेतला आणि अशा उपक्रमात आम्हाला सहभागी होता आले, हे अभिमानाची बाब आहे.
जयश्री संतोष बांदल, अध्यक्षा, व्हॅलेन्टिना वूमेन्स एपॉवरमेंट फाउंडेशन, पुणे