

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील गणेशखिंड पोस्ट ऑफिस येथे नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन शनिवारी (दि.17) मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यापीठ परिसरात आधुनिक, तंत्रज्ञानाधारित व नागरिक-केंद्रित सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या उपक्रमामुळे विद्यापीठाच्या प्रगत व नवोन्मेषी वाटचालीला आणखी बळ मिळाले आहे.
या उद्घाटन समारंभास राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी, महाराष्ट्र व गोवा सर्कलचे चीफ पोस्टमास्तर जनरल श्री. अमिताभ सिंग, पुणे क्षेत्राचे डायरेक्टर, पोस्टल सर्व्हिसेस श्री. अभिजित बनसोडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी डॉ. मेधा कुलकर्णी यांनी नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिस या संकल्पनेचे कौतुक करत टपाल विभाग आधुनिक व हायटेक होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. चीफ पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंग यांनी, पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून जुना भारत आणि नवा भारत यांचा सुंदर संगम साधला जात असल्याचे सांगितले.
डायरेक्टर, पोस्टल सर्व्हिसेस अभिजित बनसोडे यांनी आपल्या भाषणात पोस्ट ऑफिसची आवश्यकता आणि त्यामागील रोडमॅप सविस्तरपणे स्पष्ट केला. या वेळी डॉ. विजय खरे यांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नेक्स्ट जनरेशन पोस्ट ऑफिसच्या सेवांचा सक्रिय वापर करून त्याचा शैक्षणिक व वैयक्तिक जीवनात उपयोग करून घ्यावा, असे सांगितले.