

पुणे : बजाज पुणे ग्रँड टूर 2026 ही केवळ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा म्हणून मर्यादित न राहता पुढील अनेक पिढ्यांसाठी टिकून राहणारा पायाभूत आणि क्रीडा वारसा ठरणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूरच्या शुभारंभ आणि आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या स्वागत समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सामजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव दातो मनिंदर पाल सिंग उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, येथे प्रत्येक किलोमीटरवर शौर्य, परंपरा आणि संस्कृतीच्या कथा अनुभवायला मिळतील. पुणे हे सांस्कृतिक राजधानीबरोबरच तंत्रज्ञान, मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी क्षेत्रातील अग््रागण्य शहर असून, पश्चिम घाटाचे निसर्गसौंदर्य स्पर्धेला वैशिष्ट्यपूर्ण उंची देईल. ही स्पर्धा लवकरच जागतिक क्रीडा कॅलेंडरमधील प्रतिष्ठेची वार्षिक स्पर्धा बनेल, असा विश्वास व्यक्त करत, या माध्यमातून पुणे जिल्हा क्रीडा व पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय नकाशावर ठळकपणे येईल. स्पर्धेसोबत पर्यटकांना निसर्गासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक किल्ल्यांचे दर्शन घेण्याची संधी मिळणार आहे. ’यूसीआय’च्या इतिहासात मैलाचा दगड ठरेल, अशी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. सर्व रायडर्सनी खिलाडूवृत्तीने स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले.
पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी प्रास्ताविक करताना ’बजाज पुणे ग्रँड टूर 2026’ ही स्पर्धा पुणे व महाराष्ट्राच्या क्रीडा, पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय प्रतिमेसाठी मैलाचा दगड ठरेल, असे नमूद केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने केलेल्या तयारीचे त्यांनी कौतुक केले तसेच पुणेकरांनी उत्साहाने या सायकलिंग स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
या वेळी महाराष्ट्र मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेशकुमार कुमार, पिंपरी चिंचवड शहरचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, राज्याच्या क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, जि. प. सीईओ गजानन पाटील आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या वेळी जगभरातून आलेल्या सायकलपटूंचे मंचावर स्वागत करत होते, त्यावेळी सर्वांच्या नजरा सायकलपटूंच्या पोशाखावर खिळल्या होत्या. कुर्ता, पायजमा आणि त्यावर जॅकेट... असा आपल्याकडच्या महोत्सवी पोशाखात सगळे खेळाडू उठून दिसत होते. या क्षणाने भारतीय संस्कृतीचा गौरव जागतिक पातळीवर अधोरेखित झाला. विविध भाषा, देश आणि संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणारे सायकलिस्ट एकाच पारंपरिक वेशात मंचावर उभे राहिलेले दृश्य हे केवळ औपचारिक स्वागत नव्हते, तर “वसुधैव कुटुंबकम्” या भारतीय विचारधारेचे जिवंत दर्शन होते.
आंतरराष्ट्रीय बजाज पुणे ग्रँड टूरमधील सहभागी आंतरराष्ट्रीय सायकलपटूंच्या स्वागतप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील व खेळाडू.